अजित जगताप
सातारा : बोंबाळे (ता. खटाव) येथील श्री सिद्धनाथ गोसावी बुवा मंदिर परिसरात देशात विखुरलेल्या काळे कुटुंबीयांच्या वतीने वार्षिक यात्रा भरते. या वेळेला श्रीची पालखी व निवेद्य तसेच भक्तीभावाने धार्मिक विधी करून या भक्तांच्या हाकेला धावणाऱ्या श्री सिद्धनाथ गोसावी यांची पूजाअर्चा केली जाते. दोन वर्षाच्या कोरोना काळानंतर यंदाच्या यात्रेला मोठा उत्साह दिसून आला.
मार्ग पौर्णिमेच्या चतुर्थीला म्हणजे चौथ्या दिवशी बोंबाळे येथे भव्य अशी यात्रा भरते. सकाळी गोड निवैध दिल्यानंतर दुपारी श्रद्धेने बकरी कापण्याचा कार्यक्रम केला जातो. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश ,तामिळनाडू ,कर्नाटक, उत्तर प्रदेश या ठिकाणी विखुरलेले काळे कुटुंबीय हमखास आपल्या कुलदैवताच्या दर्शनासाठी येतात. सदरच्या ठिकाणी ६० ते ८० बकरी कापली गेली. त्यांचा निवेद्य दिल्यानंतर नातेवाईक, पाहुणेमंडळी व मित्र परिवारांना मनसोक्त जेवण दिले जाते.
सदर डोंगरावर अत्यंत धार्मिक पद्धतीने व आपुलकीने या ठिकाणी पाहुणचार केला जातो. सध्या भाविकांच्या देणगीच्या रूपाने श्री सिद्धनाथ गोसावी मंदिर उभारण्यात आलेले आहे. सोलापूर जिल्ह्यातील भाम येथील सिद्ध पुजारी हे वर्षभर पूजाअर्चा करतात. वडूज येथील बाळू काळे- पाटील यांचे बकरी कापल्यानंतर इतर जणांना तो मान मिळतो. त्यानंतर गजी ढोल हा नृत्याचा कार्यक्रम होतो.
या डोंगर माळरानावर विविध काळे कुटुंबीय पूजा अर्चा करून सर्वाना मटण जेवणाचे वाटप करतात. यंदाच्या वर्षी लाखभर रुपयाची देणगी देण्यात आलेली आहे. सध्या वाघजाई मंदिर येथील शिखराचे काम सुरू आहे. यासाठी अनेक मान्यवरांनी सहकार्य केले आहे.
सदरच्या मंदिराकडे जाण्यासाठी रस्ता व विद्युत पुरवठा तात्पुरता केला असला तरी भक्तांसाठी कायमस्वरूपी नागरी सुविधा उपलब्ध करावी. अशी मागणी रविराज काळे ,विक्रमसिंह काळे, विश्वास काळे, बाळासो काळे,संजय काळे, विजय काळे,चंद्रकांत काळे यांनी केली आहे. या यात्रेला प्रा बंडा गोडसे,धनंजय क्षिरसागर, अजित जगताप, परेश जाधव,मनोज पाटोळे,शशिकांत काळे,विजयकुमार शिंदे, गिरीश गोडसे, तानाजी पवार, प्रदीप शेटे, विकास जाधव, तसेच शिवाजी काळे यांच्या सह विविध गावातील मान्यवरांनी भेट दिली व प्रसाद घेतला.
दरम्यान, या वार्षिक यात्रेनिमित्त या वेळेला दीड ते दोन हजार लोकांनी प्रसादाचा आस्वाद घेतला. देशभरातील काळे कुटुंबीय कुलदैवताच्या दर्शनासाठी आवर्जून येतात. यंदाच्या वर्षी अनेक वाहने घेऊन तसेच प्रसादासाठी लागणाऱ्या वस्तू घेऊन काळे कुटुंबीय डोंगर माथ्यावर आले होते. यात्रा कमिटीच्या वतीने अत्यंत चांगल्या पद्धतीने नियोजन करण्यात आले होते.
बोंबाळे येथील सिद्धनाथ गोसावी बुवा मंदिराची आख्यायिका…
धनगर समाजातील काळे कुटुंबातील मुख्य पुरुष काळे हे खटाव तालुक्यातील एका गावात दिवसा गुरं राखण्याचे काम करत होते. त्यानंतर रात्री म्हसवड येथील श्री सिद्धीनाथाचे दररोज पायी जाऊन दर्शन घेत होते. वाढत्या वयोमानानुसार त्यांना म्हसवडला जाणे अशक्य होऊ लागले.
याची जाणीव झाल्यानंतर श्री सिद्धिनाथ यांच्याकडे प्रार्थना करून सांगितले की, आपले दर्शन घेण्यासाठी जवळ यावे. त्यानुसार श्री सिद्धीनाथांनी एक अट घातली. तुमच्या पाठीमागून येतो परंतु ज्या ठिकाणी तुम्ही वळून पहाल. त्या ठिकाणी मी थांबेन.
त्यानुसार बराच वेळ चालून आल्यानंतर काळे यांनी पाठीमागे पाहिल्यानंतर श्री सिद्धनाथ यांनी त्याच जागी निवास केला. अशी आख्यायिका आहे.