लहू चव्हाण
पाचगणी : वाहन धारकांना खड्ड्यांच्या होणाऱ्या त्रासापासून मुक्तता मिळावी यासाठी पाचगणी येथील हनुमान गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी स्वखर्चातून व श्रमदानातून शहरातील राज्य मार्गावरील खड्डे बुजवले. मंडळाच्या माध्यमातून केलेल्या दुरुस्तीमुळे हनुमान गणेश मंडळाचे कौतुक होत आहे. शहरात सर्वत्र गणेशोत्सवाचे वातावरण असून आता गणरायाला निरोप देण्याची वेळ जवळ आली आहे.
मुख्य राज्य मार्गावर ठिकठिकाणी खड्डेच खड्डे पडले आहेत. रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे. या खड्ड्यामुळे नागरिकांना दररोज नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नाकर्तेपणाबद्दल नाराजी व्यक्त करून हनुमान गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी गांधीगिरी पद्धतीने भुमिका घेत मंडळाच्या कार्यकर्त्यांनी स्वखर्चातून मुरूम आणून नवीन पोलीस स्टेशन, आंबेडकर उद्यानासमोरील खड्डे कार्यकर्त्यांनी श्रमदानातून बुजवले.
कार्यकर्ते स्वतःहून खड्डे बुजवत असल्याने स्थानिक रहिवाशांनीही या उपक्रमाचे कौतुक केले. तसेच याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने कोणताच पुढाकार न घेतल्याने या गांधारीच्या भूमिकेबाबत पाचगणी करांनी नाराजी व्यक्त केली.
या श्रमदानात अध्यक्ष विशाल गायकवाड, उपाध्यक्ष प्रमोद कासुर्डे, खजिनदार क्षितीज कासुर्डे,स्वराज्य बेलोशे, सुशांत महाडिक, सुशांत सनस, यश कासुर्डे, रियान सय्यद, समिर टकलकी, आयविन डिसोझा, आकाश कासुर्डे, सुरज कदम, सिलडोन डिसोझा, युवराज वन्ने, अजिंक्य कासुर्डे आदींनी परिश्रम घेतले.
दरम्यान, मंडळांने गोळा केलेल्या वर्गणीतून गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी वह्या व पेन वाटप करण्यात आले. त्याचबरोबर शहरातील कचरा वेचकांचा सत्कार करुन सामाजिक कार्याला हातभार लावला आहे.