पुणे : उन्हाळा सुरु झाला की राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पाणी टंचाई (Water shortage) जाणवू लागते. पुण्यात धरणातील पाणीसाठा तळ गाठतो आहे. त्यामुळे पुढील मे- जून महिन्यामध्ये पुणेकरांना पाणी टंचाईचा सामना करावा लागू शकतो, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी पालिकेकडून काही नियम जारी करण्यात आले आहे.
पुणे शहरास पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांपैकी खडकवासला (Khadakwasla dam) हे एक प्रमुख धरण आहे. या धरणातील पाणीसाठाही झपाट्याने कमी होतोय. सध्या खडकवासला धरणामध्ये दीड महिना पुरेल इतकेच पाणी शिल्लक आहे. सध्या उपलब्ध साठा 9.43 टीएमसी इतका आहे. त्यामुळे पिण्यासाठी 6 टीएमसी पाणी उपलब्ध आहे. मे, जून महिन्यामध्ये पुणेकरांना पाणी टंचाईला सामोरे जाण्याची शक्यता असल्याचा अंदाज आहे.
गेल्या वर्षी पाऊस कमी झाल्याने आणि यावर्षी उकाडा जास्त असल्यामुळे धरणांमधील पाणीसाठा कमी झाला आहे. सध्या उपलब्ध असलेल्या पाणीसाठ्यातील शेतीसाठीचे एक आवर्तन आहे. त्यामुळे पिण्याचे पाणी फक्त 6 टीएमसी इतकेच शिल्लक आहे. खडकवासलाबरोबरच उजनी धरणाच्या पाणीपातळीतही घट झालेली आहे. त्यामुळे पुणे, इंदापूर तालुक्याच्या काही भागातील गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागतोय.