लहू चव्हाण
पांचगणी : पांचगणी गिरिस्थान नगरपरिषदेने सिद्धार्थ नगर येथे उभारलेल्या ऐस टी पी प्लॅन्ट चे पाणी काटवली गावच्या हद्दीत सोडल्यास गावच्या पिण्याच्या पाण्यास धोका पोहोचणार आहे. त्यामुळे ते पाणी सोडू नये आणि जर त्यामुळे काही अघटीत घडल्यास त्याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहणार आहे का? असे सवाल ग्रामस्थांनी पांचगणी गिरिस्थान नगरपालिकेला केला आहे.
पांचगणी गिरिस्थान नगरपरिषदेचे मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांना ग्रामस्थांनी आज निवेदन दिले आहे. यावेळी रामचंद्र बेलोशे, जयवंत राजपुरे, विक्रम पोरे, सखाराम शिंदे, रामचंद्र कदम, प्रवीण बेलोशे, आदित्य बेलोशे, संतोष कवी, मारुती शेडगे आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याबाबत अधिक माहिती अशी की, पांचगणी येथील शाहूनगर आणि सिद्धार्थनगर या हद्दीला लागूनच काटवली गावची हद्द येत आहे. या डोंगरातून गावाला पाणी पुरवठा करणारे पाच झरे आहेत. या झऱ्यांच्या माध्यमातून डोंगराच्या पायथ्याशी असणाऱ्या गावाला पाईप लाईन च्या माध्यमातून पिण्याचे पाणी पुरवले जाते.
गेल्या दोन वर्षापूर्वी पालिकेने शाहूनगर येथे एस्टी पी प्लॅन्ट उभारून त्याचे आऊट सोर्स चे पाणी थेट डोंगरातून सोडून दिले आहे. त्यामुळे आमच्या पीण्याच्या पाण्यात हे पाणी जाण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने त्यावेळच्या तत्कालीन नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांना महिलांनी निवेदन दिले होते. व ते पाणी शेजारी असणाऱ्या कड्यावरून सोडण्याची विनंती केली होती. परंतु आपल्या पालिकेने पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे.
दरम्यान, नगरपालिकेने सिद्धार्थनगर येथे डोंगरमाथ्यावर दुसरा ऐस टी पी प्लांट उभारला आहे. त्याचेही पाणी आपण खाली डोंगरात सोडणार आहे. त्यामुळे आणखी हे पाणी दूषित होण्याचा धोका आहे. त्यामुळे हे पाणी आपण आमच्या हद्दीत सोडू नये. अशी विनंती ग्रामस्थांनी केली आहे. अन्यथा जर बळजबरीने सोडण्यात आले तर पुढील होणाऱ्या परिणामास आपण जबाबदार राहाल. अशा आशयाचे निवेदन ग्रामस्थांनी मुख्याधिकारी यांना दिले आहे.
याबाबत बोलताना पांचगणी गिरिस्थान नगरपरिषदेचे मुख्याधिकारी गिरीश दापकेकर म्हणाले कि, हे पाणी पूर्णपणे शुद्ध असणार असले तरी ग्रांमस्थांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असल्याने आपण सर्वजण त्या ठिकाणी जावून यावर कायमस्वरूपी तोडगा काढू. आणि तुम्हाला त्रास होणार नाही याची काळजी आम्ही घेवू. असे उपस्थित नागरिकांना सांगितले.