वाराणसी : ज्ञानवापी मशीद प्रकरणात वाराणसी जिल्हा न्यायालयाने हिंदू पक्षाच्या बाजूने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. हिंदू पक्षाने दाखल केलेली याचिका सुनावणीयोग्य असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. तर मुस्लीम पक्षकारांची याचिका वाराणसी न्यायालयाने फेटाळली आहे. यासंदर्भात पुढील सुनावणी २२ सप्टेंबरला होणार आहे. असा निकाल जिल्हा न्यायाधीश डॉ. अजय कृष्ण विश्वेश यांच्या खंडपीठाने दिला आहे.
ज्ञानवापी मशीद परिसरात असलेल्या हिंदू देवतांच्या दैनंदिन पुजेच्या परवानगीसाठी पाच हिंदू महिलांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. अंजुमन इंन्तेझामिआ मशीद समिती’ने ज्ञानव्यापी मशिदीची जागा वक्फ बोर्डाची संपत्ती असल्याचा दावा करत हिंदू पक्षाने दाखल केलेल्या याचिकेवर प्रश्नचिन्ह उभे केले होते. तर या जागेवर असलेले मंदिर पाडल्यानंतर मशीद बांधण्यात आली, असा दावा हिंदू याचिकाकर्त्यांनी केला होता. धार्मिकदृष्ट्या संवेदनशील असलेल्या या याचिकेवरील निकाल जिल्हा न्यायाधीश ए. के. विश्वेश यांनी गेल्या महिन्यात राखून ठेवला होता.
दरम्यान, ज्ञानवापी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर वाराणसीचे पोलीस आयुक्त ए. सतीश गणेश यांच्या आदेशानंतर आयुक्तालय क्षेत्रात कलम १४४ म्हणजे जमावबंदी लागू करण्यात आली आहे. पोलीस आणि प्रशासकीय कर्मचारी हाय अलर्टवर आहेत. सर्व एसएचओ, एसीपी, एडीसीपी आणि डीसीपी अतिरिक्त सतर्कता बाळगून आहेत, सोशल मीडियावर लक्ष ठेवले जात आहे. पोलीस धर्मगुरूच्या सतत संपर्कात आहेत.
याबाबत बोलताना याचिकाकर्ते सोहन लाल आर्या म्हणाल्या कि, “हा हिंदू समाजाचा विजय आहे. न्यायालयाचा हा निर्णय ज्ञानव्यापी मंदिरासाठी रचण्यात आलेला पाया आहे” अशी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच राज्यात शांतता टिकवण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.