पुणे : महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती गाडीत असल्याने तिरुपती बालाजी देवस्थानने भाविकाचा प्रवेश नाकारल्याचा धक्कादायक आरोप एका व्यक्तीने केला आहे. तसेच त्याने यासंदर्भात एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामुळे शिवप्रेमींमधून या घटनेचा सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.
आंध्र प्रदेशातील तिरुमाला तिरुपतीच्या दर्शनाला गाडीमधून चाललो होतो, तेव्हा गाडीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती असल्याने चेकपोस्ट थांबविण्यात आले. त्यानंतर गाडीतील मूर्ती काढा नाही तर पुढे जाऊ देणार नाही, असे मला चेकपोस्टवर सांगण्यात आले. प्रवेश नाकारल्यानंतर मी तेथील प्रमुख अधिकाऱ्याला देखील जाऊ देण्याची विनंती केली, मात्र त्यांनीही मला जाऊ दिले नाही. असा दावा त्या व्यक्तीने केला आहे.
व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा :
शिवाजी महाराजांपेक्षा माझ्यासाठी कोणी मोठे नाही, मी मूर्ती काढू शकणार नाही. म्हणून मी परत चाललो आहे. महाराष्ट्रातून येणाऱ्या प्रत्येकाने महाराजांची मूर्ती गाडीत लावून यावे, त्याशिवाय या लोकांना कळणार नाही, असेही व्हिडीओमध्ये तो व्यक्ती म्हणतो. मात्र, याबाबत तिरुमाला तिरुपती संस्थानकडून स्पष्टीकरण देण्यात आले असून व्हायरल व्हिडिओमधून करण्यात आलेले आरोप खोटे असल्याचे सांगितले आहे.
याबाबत तिरुमाला तिरुपती संस्थानच्या जनसंपर्क कार्यालयाने म्हटले आहे की, दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील वाहन अलिपिरी चेक पॉइंटवर सुरक्षा कर्मचाऱ्यांनी अडवून त्याची तपासणी केली होती. यावेळी सुरक्षा कर्मचाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती ओळखली. आणि त्यांना तिरुमला येथे जाऊ दिले, असे पत्रकात म्हटले आहे.
दरम्यान, सदरील व्यक्तीला देवतांची चित्रे वगळता व्यक्तींचे मूर्ती, राजकीय पक्षांचे ध्वज आणि इतर चिन्हे प्रदर्शित करू नयेत, असे सांगण्यात आले. पण या भक्ताने आमच्यावर शिवाजी महाराजांचा अपमान केल्याचा आरोप करत एक व्हिडिओ बनवला. आणि इतरांना चिथावणी देण्यासाठी सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. असे संस्थानने स्पष्ट केले आहे.