पुणे : स्वातंत्रपूर्व काळात स्थापन झालेल्या महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीला १६२ वर्ष पूर्ण होत आहे.त्या निमित्याने आताच्या पिढीला तीन संस्थापकांचे योगदान कळावे, यासाठी संस्थेतर्फे ‘वज्रमूठ’ हे महानाट्य तयार केले आहे. यात सुमारे २३६ कलाकार काम करीत असून ते महाविद्यालय,शिक्षक, प्रशासकीय कर्मचारी व माजी विद्याथ्यांचा समावेश आहे.
रविवार दिनांक २० नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ५ ते रात्री ८ या वेळेत गणेश कला क्रीडा मंच येथे नाटक सादर होणार असून यात तब्बल २३६ कलाकारांनी आपला सहभाग नोंदविला असल्याची माहिती सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष राजीव सहस्रबुद्धे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.
स्वातंत्रपूर्व काळात आद्यक्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके, वामन प्रभाकर भावे व लक्ष्मण नरहर इंदापूरकर यांनी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी स्थापना केली. त्यांना कोणत्या अडचणी आल्या यावर या नाट्यात प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. कार्यक्रमास नृत्यांगना मनीषा साठे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एअर मार्शल भूषण गोखले उपस्थित राहणार आहेत.