लोणी काळभोर : मागील तेरा वर्षापासून बंद असलेला थेऊर (Theur) (ता. हवेली) येथील यशवंत सहकारी कारखाना (Yashwant Cooperative Factory ) आता सुरु होणार असल्याने शेतकऱ्यांसह नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मात्र, कारखाना सुरु होण्यापूर्वीच कारखान्यातील साहित्याची चोरी करताना तीन महिलांना सुरक्षारक्षकांनी सोमवारी (ता.२९) दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास रंगेहाथ पकडून लोणी काळभोर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. त्यांच्याकडून सुमारे 1950 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सुरेख भलभिम सरोदे (वय ५५), रेखा जगन पात्रे (वय ५०) व ज्योती विष्णु रोकडे (वय ३५ सर्व रा. वाघोली बाजाराजवळ, वाघोली, पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या महिलांची नावे आहेत. याप्रकरणी कारखान्याचे सुरक्षारक्षक योगेश भगवान गायकवाड (वय ३६ रा. यशवंत सहकारी कारखाना कॉलनी, थेऊर ता. हवेली जि. पुणे) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, योगेश गायकवाड हे यशवंत सहकारी कारखान्यावर सुरक्षारक्षक म्हणून काम करतात. कारखाना सदया बंद स्थितीत असून त्याची साधन सामग्री ही कारखान्याच्या परीसरात उघडावर आहे. त्याचे संरक्षण करण्यासाठी गायकवाड यांची नेमणूक करण्यात आली आहे. योगेश गायकवाड हे नेहमीप्रमाणे सोमवारी काम करीत असताना, त्यांना दुपारी सव्वाचार वाजण्याच्या सुमारास तीन अनोळखी महिला दिसल्या. आणि त्यांच्या डोक्यावर भरलेले पोते घेऊन जात असलेले दिसले. योगेश गायकवाड यांनी महिलांना हटकले, तेव्हा तिन्ही महिला मला पाहून पळून जाऊ लागल्या असे ते म्हणाले.
त्यानंतर योगेश गायकवाड यांनी त्यांचे सुरक्षारक्षक मित्र रामराव कल्याणकर, संजय धनवडे व गोकुळ गायकवाड त्वरित बोलावून घेतले. सुरक्षा रक्षकांनी तिन्ही महिलांना अडविले. आणि तत्काळ या घटनेची माहिती लोणी काळभोर पोलिसांना दिली. या घटनेची माहिती मिळताच, लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अमोल घोडके, पोलीस हवलदार हर्षदीप जोगदंड, पोलीस अंमलदार अजिंक्य जोजारे तातडीने घटनास्थळी दाखल झाले.पोलिसांनी त्वरित तिन्ही महिलांना ताब्यात घेतले.
दरम्यान, पोलिसांनी महिलांच्या पोत्यांची पाहणी केली असता, पोत्यामध्ये ८०० रुपये किंमतीचे अॅल्युमिनियमची हॅलोजन बॉडी, ६०० रुपये किंमतीची अॅल्युमिनियमची केबल, ५०० रुपये किंमतीची ताब्याची तुटलेली केबल व ५० रुपये किंमतीचे अॅक्सा ब्लेडपान असा एकूण 1950 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.
याप्रकरणी तिन्ही आरोपी महिलांच्या विरोधात लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार
सुनील नागलोत करीत आहेत.