पुणे : पुण्यात पुन्हा एकदा कोयता गँगने राडा केल्याची घटना समोर आली आहे. पुण्यात परिसरात टोळक्याने तरुणाच्या हाताचा पंजा कोयत्याने तोडला. बिबवेवाडीमध्ये तरुणांच्या टोळक्याने कोयत्याने दोन जणांवर जीवघेणा हल्ला केला आहे. या घटनेमुळे पुण्यात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करत पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे.
या घटनेमध्ये एका तरुणाला आपला हाताचा पंजा गमवावा लागला आहे. याप्रकरणी २४ वर्षीय तरुणाने बिबवेवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या हल्ल्यामध्ये पीयूष पाचकुडवे हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणात सागर सरोज आणि त्याच्या इतर साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून बिबवेवाडी पोलिसांनी याप्रकरणी एका अल्पवयीन तरुणासह २ जणांना ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीचनुसार, हा सर्व प्रकार सोमवारी सायंकाळी ४.३० वाजता घडला. फिर्यादी आणि त्याचा मित्र पीयूष यांना आरोपींकडून भेटायला बोलवण्यात आले होते. पूर्वी त्यांच्यात वाद झाल्याने या वादाचा बदला घेण्यासाठी आरोपींनी त्यांच्यावर कोयत्याने वार केले. यामध्ये पीयूष याच्या हातावर आरोपींनी कोयता मारला ज्यामध्ये त्याच्या हाताचा पंजा खाली पडला आणि पीयूष गंभीर जखमी झाला.
एवढेच नाही तर पीयूषच्या हातावर आणि मांडीवर सुद्धा आरोपींकडून कोयत्याने वार करण्यात आले. कोयता हल्ल्यामध्ये दोन्ही तरुण गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून पीयूष याचा हाताचा पंजा जोडायचा प्रयत्न सुद्धा केला आहे. याप्रकरणाचा अधिक तपास पोलिसांकडून सुरू आहे.