( Railway News ) पुणे : पुणे ते दौंड दरम्यान प्रतितास १३० किलोमीटर वेगाने रेल्वे चालविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कमिशन ऑफ रेल्वे सेफ्टी (सीआरएस) यांनी विविध चाचण्या केल्यानंतर नुकतीच या मार्गावर १३० किलोमीटर वेगाने रेल्वे चालविण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे प्रवासाचा वेळ आणखी २० ते ३० मिनिटे वाचणार आहेत.
या मार्गावर विविध चाचण्या पूर्ण झाल्यानंतर आता “सीआरएस’ यांच्याकडून १३० किलोमीटर वेगाने रेल्वे धावण्यास परवानगी मिळाली आहे. पण, पुणे रेल्वे स्टेशनचे (Pune Railway Station) काम सुरू होणार असल्याने प्रत्यक्ष रेल्वे १३० किलोमीटर वेगाने धावण्यास परवानगी मिळालेला पहिला मार्ग ठरला आहे.
पुणे-दौंड दरम्यान दुहेरीकरण व मार्गाचे विद्युतीकरणाचे काम पूर्ण
पुणे विभागातील पुणे ते दौंड मार्गावर सध्या प्रतितास ११० किलोमीटर वेगाने रेल्वे धावत आहे. नुकतेच पुणे विभागात संपूर्ण विद्युतीकरणाचे काम झाले आहे. तसेच पुणे-दौंड दरम्यान दुहेरीकरण व मार्गाचे विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे या मार्गावरील रेल्वेचे स्पीड वाढविण्यासंदर्भात चाचपणी सुरू होती. पण, कमिशन ऑफ रेल्वे सेफ्टी यांची परवानगी आवश्यक असते. त्यांच्याकडून रेल्वे मार्गाचे काम, सिग्नलिंग, इंजिनिअरिंग, ओएचई अशा विविध कामांची पाहणी केली जाते. त्यानंतरच ही परवानगी दिली जाते.
दरम्यान, पुणे-लोणावळा मार्गावर सध्या प्रतितास ११०वेगाने रेल्वे धावतात. या मार्गाला अद्याप तरी १३० किलोमीटर प्रतितास वेगाने रेल्वे चालविण्यास सीआरएसची परवानगी
मिळालेली नाही. या मार्गावर ओएचई व इतर काही तांत्रिक गोष्टींमुळे अद्याप परवानगी मिळालेली नाही. त्यामुळे पुणे विभागातील पुणे दौंड मार्ग हा प्रति १३० किलोमीटर वेगाने धावण्यास परवानगी मिळालेला पहिला मार्ग ठरला आहे.