शिक्रापूर : पारोडी (ता. शिरूर) येथील विद्यमान महिला सरपंचाच्या मुलासह त्याच्या मित्रांनी मद्यधुंद अवस्थेत महिलेचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. एवढ्यावरच न थांबता आरोपींनी कोयत्याने दहशत पसरवून कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. याप्रकरणी शिक्रापूर पोलीस ठाण्यात 5 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अभिषेक बाळासाहेब टेमगिरे व त्याच्या चार अनोळखी साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी 24 वर्षीय महिलेने शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या गृहिणी असून पारोडी परिसरात कुटुंबासोबत राहतात. तर फिर्यादी यांचे पती हे एक वाहनचालक आहेत.
दरम्यान, फिर्यादी यांचे पती हे घरातील संपलेला किराणा माल आणण्यासाठी सोमवारी (ता.23) रात्री आठ वाजण्याच्या सुमारास गेले होते. वस्तू घेऊन येत असताना, आरोपी अभिषेक टेमगिरे व त्याच्या चार मित्रांनी फिर्यादी यांच्या पतीला अडविले. आणि आरोपी फिर्यादी यांच्या पतीशी वाद घालू लागले. तेव्हा फिर्यादी या भांडणे सोडविण्यासाठी गेल्या असता, फिर्यादी यांच्याशी अश्लील भाषेत शिवीगाळ करत विनयभंग केला. तर यावेळी आरोपी अभिषेक सोबत असलेल्या त्याच्या चार साथीदारांनी त्यांच्या गाडीतून कोयता काढून महिलेसह तिच्या पतीला, दमदाटी करत कोयता दाखवत संपूर्ण कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली.
एवढ्यावरच न थांबता आरोपींनी शिवीगाळ करून फिर्यादी यांच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. याप्रकरणी शिक्रापूर पोलीस ठाण्यात आरोपींच्या विरोधात विनयभंग केल्यामुळे आरोपींवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच, आरोपी फरार झाले आहे. पोलिसांनी आरोपींना तत्काळ अटक करावी. अशी मागणी जोर धरू लागली आहे. तर पोलिसांच्या कारवाईकडे नागरीकांचे लक्ष लागले आहे. पुढील तपास शिक्रापूर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार संदीप इथापे करीत आहेत.