पंढरपुर : महाराष्ट्रातील प्रमुख देवस्थान असलेल्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचा सात मजली दर्शन मंडप पाडण्यात येणार आहे. त्या ठिकाणी तिरूपती बालाजीच्या धर्तीवर विठ्ठल रुक्मिणीच्या पदस्पर्श दर्शन रांगेची व्यवस्था करण्यात येणार आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली आहे.
जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकाऱ्यांचे एक शिष्टमंडळ बालाजी देवस्थानची आणि तेथील दर्शनरांगेची पाहणी करण्यासाठी गेले आहे. बालाजी देवस्थानप्रमाणे येथील दर्शन रांगेची व्यवस्था करण्याचा विचार सुरु आहे.
विठुरायाच्या दर्शनासाठी देशभरातून दररोज हजारो भाविक पंढरपूरला येतात. येणाऱ्या भाविकांच्या तुलनेत येथील दर्शन व्यवस्था अपुरी आहे. जलद आणि सुलभपणे विठुरायाचे दर्शन व्हावे. यासाठी प्रशासनाने आराखडा तयार केला आहे.
मागील ३५ वर्षापूर्वी मंदिराजवळ उभारण्यात आलेला दर्शन मंडपही आता निरुपयोगी ठरला आहे. तो मंडप आता पाडण्यात येणार असून त्या ठिकाणी पार्किंग, अग्नीशमन आणि मंदीर समितीचे कार्यालय उभारण्य़ात येणार आहे. त्या अनुषंगाने वरिष्ठ अधिकाऱ्यांचे एक पथक बालाजी देवस्थनाच्या भेटीसाठी गेले आहे. तेथील दर्शन व्यवस्थेची पाहणी केल्यानंतर पंढरपुरातही तशी दर्शन व्यवस्था राबवण्याचा विचार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.