पुणे : नोकरानेच मालकाला ६० ते ७० लाखांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पुणे गुन्हे शाखेच्या युनिट-१ च्या पथकाने खंडणी मागणाऱ्या नोकराला अटक केली आहे. नितीन देवलाल सरोज (वय ३१) असे नोकराचे नाव आहे. याबाबत सुरज बागमार यांनी खडक पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीन हा बागमार यांच्याकडे नोकरी करत होता. नोकरी सोडल्यानंतर त्याने बागमार यांना खंडणी मागण्याची योजना आखली. त्यासाठी नितीनने बागमार यांना फोन करून पैशांची मागणी केली. पैसे न दिल्यास त्यांना व कुटुंबीयांना ठार मारण्याची धमकी दिली. त्यानुसार गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त निखील पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपींचा शोध सुरू केला असता तांत्रिक विश्लेषणावरून आरोपीची ओळख पटली.
आरोपी हा सोमवार पेठेत एका ठिकाणी काम करत होता. त्या वेळी पोलिस अंमलदार नितीन देसाई यांना मिळालेल्या माहितीवरून सोमवार पेठेतून युनिट-१ च्या पथकाने नितीन सरोज याला अटक केली. सहायक पोलिस निरीक्षक गणेश इंगळे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक शब्बीर सय्यद, सहायक पोलिस निरीक्षक अभिजित पाटील, अंमलदार शुभम देसाई, नीलेश साबळे, विठ्ठल साळुंखे यांच्या पथकाने ही कारवाई केली.