पुणे : आळंदीमध्ये पुन्हा एकदा इंद्रायणी नदी प्रदूषित झाल्याचे दिसून आले आहे. मोठ्या प्रमाणात नदी फेसाळली आहे. महाराष्ट्राच श्रद्धास्थान असलेल्या माऊलींच्या आळंदीत इंद्रायणीमध्ये वारकरी पवित्र स्थान करत असतात. परंतु, आता नदी फेसाळल्यामुळे वारकऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न उभा राहिला आहे.
इंद्रायणी नदी ही वारंवार फेसाळते आहे. आज सुद्धा इंद्रायणी नदीत पांढरे शुभ्र मोठ-मोठे बर्फासारखे तुकडे पाण्यावर तरंगत असतांना दिसून येत आहेत. गेल्या कित्येक महिन्यापासून आळंदीकर आणि वारकऱ्यांकडून इंद्रायणी नदी स्वच्छ करण्याबाबत आवाहन केलं जात होतं. तसेच काही राजकीय पक्षांनी देखील इंद्रायणी नदी काठावर आंदोलन करून इंद्रायणी प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर आणला होता.
माजी मुख्यमंत्री तथा सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून देखील इंद्रायणी प्रदूषण मुक्त करण्याचा आश्वासन देण्यात आलं होतं. त्यानंतर प्रशासनामार्फत काही पावलं उचलण्यात आली. परंतु, आज पाहिलं तर नदीची अवस्था जैसे थे असल्याचं पाहायला मिळत आहे. खासदार आणि आमदार याबाबत कुठलाही मुद्दा अधिवेशनात किंवा संसदेत दिसत उपस्थित करत नाहीत.