पुणे : खडकवासला धरणातून गुरुवारी (ता. ११) सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास २६ हजार ८०९ क्युसेक पाणी सोडले जाणार आहे.
खडकवासला धरण पूर्ण क्षमतेने म्हणजे १००% भरले असल्याने धरणाच्या सांडव्यातून चालू असणारा १८ हजार ४९१ क्युसेक विसर्ग वाढवून २६ हजार ८०९ क्युसेक करण्यात येणार आहे. अशी माहिती खडकवासला पाटबंधारे विभागाचे सहायक अभियंता यो. स. भंडलकर यांनी दिली.
पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळी प्रकल्पात सुरू असलेला मुसळधार पाऊस गुरुवारी सकाळपर्यंत कायम होता. त्यामुळे पानशेत धरण १०० टक्के भरले असून या धरणातून खडकवासला धरणात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
दरम्यान, पावसाच्या प्रमाणानुसार व येव्यानूसार विसर्ग कमी किंवा जास्त करण्याची शक्यता आहे. नदीकाठच्या नागरिकांनी दक्षता घ्यावी असे आवाहन खडकवासला, पानशेत व वरसगाव प्रकल्प सहाय्यक अभियंता यो. स. भंडलकर यांनी केले आहे.