सुरेश घाडगे
परंडा : पावसाने दडी मारल्याने तालुक्यातील खरीप हंगामातील फुल फळाला आलेली पिके सुकून गेली आहेत. ऐन भरात पाऊस – पाण्या अभावी खरीप हंगाम धोक्यात आला आहे. यामुळे शेतकरी वर्ग अडचणीत सापडला आहे. तर अनेक शेतकऱ्यांनी पिकावर नांगर फिरवला आहे.
परंडा तालुक्यात पावसाने दडी मारल्याने शेतकरीवर्ग चिंताग्रस्त झाला आहे. केवळ चांदणी मध्यम प्रकल्प भरला आहे . तर खासापूरी , साकत व निम्नखैरी पांढरेवाडी या मध्यम प्रकल्पात व सिना कोळेगाव धरण या प्रकल्पात अपुर्ण पाणीसाठा आहे. ज्या शेतकऱ्यांना पाणी आहे त्या शेतकऱ्यांना सततच्या खंडीत वीजपुरवठ्यामुळे पाणी असूनही पिकाला पाणी देणे अवघड झाले आहे.
दरम्यान, नारळी पोर्णिमा, बैलपोळा या मुहूर्तावर पाऊस पडेल अशी आशा होती .परंतू हे मुहूर्तही कोरडेच गेल्याने शेतकरी धास्तावला आहे. जवळपास १५ दिवस झाले पावसाने प्रदिर्घ उघडीप दिली आहे. पाऊस गायब झाला आहे. यांमुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. आता गणरायाचे आगमन, पाऊस घेवून येईल का ? याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.