बापू मुळीक / सासवड : अंत्योदय अर्थात पिवळ्या शिधापत्रिका धारकांना गेल्या नऊ महिन्यापासून साखर मिळालेली नाही. प्रत्येक तीमाहीत मिळणारी साखर मार्च महिन्यांपासून बंद आहे. पुरवठा विभागाने सप्टेंबर अखेरपर्यंतच्या दोन तीमाईची मागणी केली असली, तरी राज्य सरकारकडून त्याची पूर्तता झालेली नाही. तर डिसेंबर अखेरच्या तीमाहीची अद्याप नोंदणी करण्यात आलेली नाही. साखरेचे नियोजन झाल्यानतर त्याचे वाटप केले जाईल, अशी माहिती अधिकाऱ्याकडून देण्यात आली आहे.
या योजनेत पुरंदर तालुक्यात एकूण 5 हजार 300 शिधापत्रिकाधारक आहेत. रेशनवर एप्रिल पासून साखर मिळेना, जिल्ह्यात स्वस्त धान्य दुकानांमधून अंत्योदय योजनेतील ग्राहकासाठी दरमहा एक किलो साखर वीस रुपये किलो दराने दिली जाते. दर तीन महिन्यांनी ही साखर राज्य सरकारकडून उपलब्ध करून दिली जाते. मात्र, जिल्ह्यात मार्च अखेर उपलब्ध झालेली साखर ग्राहकांना देण्यात आली.
त्यानंतर शहराचा अन्नधान्य पुरवठा सांभाळणाऱ्या अन्नधान्य वितरण अधिकारी कार्यालयाकडून तसेच जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाकडून जून व सप्टेंबर अखेर या दोन तीमाहीसाठी साखरेची नोंदणी केली होती. ती अद्याप मिळालेली नसल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. तर डिसेंबर अखेरची नोंदणी अद्याप करण्यात आलेली नसल्याचेही सांगण्यात आले आहे.
दुकानदारांसोबत होत आहेत वाद
नऊ महिन्यापासून रेशनची साखर न मिळाल्याने ग्राहक संताप व्यक्त करत असून, दुकानदारांसोबत वाद होत आहेत. मार्च अखेर मिळालेली साखर केव्हा मिळेल असा सवाल ग्राहक उपस्थित करत आहेत. अशी माहिती रेशन दुकानदार संघटनेचे अध्यक्ष अशोक दळवी यांनी दिली.
राज्य सरकारकडे गेल्या दोन तिमाहीच्या साखरेची मागणी केली आहे. उपलब्ध झाल्यानंतर वितरण करण्यात येईल.
गोपाळ ठाकरे, वरिष्ठ अधिकारी, पुरवठा अधिकारी कार्यालय, पुरंदर