पुणे : सर्वसामान्य नागरिकांना एक झटका देणारी बातमी समोर आली आहे. दिवाळीचा सण तोंडावर आला असताना सर्वसामान्य नागरिकांच्या खिश्याला कात्री बसणार आहे. कारण दुधाच्या किमंतीमध्ये पाच ते सहा रुपयांनी वाढ होणार आहे. अशी माहिती इंडियन डेअरी असोसिएशनचे संचालक चेतन नरके यांनी दिली आहे.
तसेच दूधाच्या एकूण उत्पादनात 7 ते 10 % घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दूध खरेदीसाठी दूध संघांमध्ये स्पर्धा निर्माण होऊन सर्वसामान्यांसाठी दूध महागणार आहे. अति व अनियमित पावसामुळे हिरव्या चाऱ्याची कमतरता निर्माण झाल्यामुळे वैरणीची कमतरता भासत असल्यामुळे, गव्हाचे उत्पादन घटल्यामुळे तसेच इंधन, वाहतूक व कच्च्या मालाच्या वाढत्या किमतींमुळे पशुखाद्याच्या दरात वाढ झाली आहे. त्यामुळे पशूपालकांनी पशूखाद्य घेणे कमी केले.
दरम्यान, याचा परिणामही दूध उत्पादनावर होत आहे. त्यातच लम्पी रोगामुळे अनेक दुधाळ जनावरे मृत्यू मुखी पडली आहेत. परिणाम दूध उत्पादनावर झाल्याचे दिसून आले आहे. यावर्षी दुधाचा फ्लश सिझन आलाच नसल्याने दरवर्षी अतिरिक्त दुधातून लीन सिझन साठी वापरण्यात येणाऱ्या दूध पावडरची निर्मिती थांबली आहे. याचा परिणाम पुढील वर्षापर्यंतच्या दूध पुरवठ्यावर होणार आहे. अशी परिस्थिती जवळपास ऑक्टोबर 2023 पर्यंत कायम राहणार आहे.