MNS : : मुंबई : सभागृहात नवाब मलिक यांच्या सत्ताधारी बाकावर बसण्यावरून मोठा गदारोळ झाला होता. आता तसाच गदारोळ प्रफुल्ल पटेलांवरुनही होणार यात काही शंका नाही. विरोधकांच्या सुरात सूर मिळवत आता मनसेनेही सवाल उपस्थित केला आहे. एक्स अकाऊंटवरून त्यांनी सरकारला टोलेबाजी केली आहे.
मनसेचा सरकारला खोटक टोला
हिंदुत्वाच्या श्रीखंडात देशद्रोह्यांची ‘मिर्ची’ टाकणं महायुतीच्या ‘प्रफुल्लित’ कार्यकर्त्यांना ‘पटेल’ ? आणि हो, ‘नवाब’चाही ‘जवाब’ ‘पटेल’ असाच द्या. अशी पोस्ट मनसेने केली आहे. याला महायुतीकडून किंबहूना भाजपाकडून कसे उत्तर दिले जाईल हे पाहणं महत्त्वाचं आहे.
नवाब मलिक प्रकरणावरुन महायुती सरकारची कोंडी झाली आहे. त्यात आता प्रफुल्ल पटेलांचा इक्बाल मिर्चीबरोबरच्या संबंधांबाबतचा मुद्दाही तोंडवर काढत आहे. त्यांच्याविषयी कुणी काहीच का बोलत नाही? असाही प्रश्न विरोधकांनी विचारला आहे. यामध्ये आता मनसेनेही उडी घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक हे हिवाळी अधिवेशनात सहभागी झाले. दोन्ही दिवस मलिक हे विधीमंडळाच्या सभागृहात सत्ताधारी बाकावर बसले. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहून नवाब मलिक यांना महायुतीत घेता येणार नाही, असं स्पष्ट केलं. दरम्यान, फडणवीसांच्या पत्राला खासदार संजय राऊत यांनी ढोंग म्हटलं आहे.
पटेल यांचे इक्बाल मिर्चीशी संबंध असल्याने त्यांचे वरळीतील सीजे हाऊस या मालमत्तेच्या विकासावरून ईडीने २१ जुलै २०२२ रोजी मालमत्ता जप्त केल्या. ईडीने पटेल यांच्या सदनिका, एक चित्रपटगृह, हॉटेल, पाचगणी येथे एक हॉटेल, दोन बंगले आणि साडेतीन एकर जमीन एवढ्या मालमत्तेवर टाच आणली आहे.पटेल यांचे मिर्चीशी असलेल्या संबंधांवरून फडणवीस आणि अन्य भाजप नेत्यांनी ईडीच्या कारवाईनंतर आणि आधीही अनेकदा आरोप केले होते. मलिक यांच्यावर देशद्रोही दाऊदशी संबंध असल्याचे आरोप फडणवीस यांनी केले, तर मिर्ची आर्थिक संबंधांचा मुद्दा उपस्थित केला होता. पटेल यांच्याविरोधात मोर्चे काढले होते. हे सगळे मुद्दे आता विरोधक उचलून धरत आहेत.