लोणी काळभोर : हवेली तालक्यात आज सोमवार (ता. २९) पासुन ११ गुंठ्यांच्या दस्तनोंदनीस सुरुवात झाली आहे. भाजपचे तालुका अध्यक्ष संदीप भोंडवे यांच्या आंदोलनाला अखेर मोठे यश आले आहे. तर अकरा गुठ्यांची दस्तनोंदणी सुरु झाल्याने हवेलीचा अडकलेला आर्थिक गाडा पुन्हा एकदा रुळावर आली आहे.
हवेली तालुक्यात ११ गुंठ्यांची खरेदीखते सुरु व्हावीत या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाचे तालुका अध्यक्ष संदीप भोंडवे व त्यांच्याी सहकाऱ्यांनी विधानभवनासमोर आमरण उपोषणास बसण्याचा निर्णय घेतला होता. या इशाऱ्यावर नोंदणी व मुद्रांक विभागाचे राज्य महानिर्देशक श्रावण हार्डीकर यांनी उपोषणकर्ते संदिप भोंडवे यांना उपोषण पाठीमागे घेण्याचे अश्वासित करुन २९ ऑगस्ट पासून हवेली तालुक्यातील सर्व दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदी खते नोंदविण्याचे पत्र देऊन उपोषण मागे घेण्यास भाग पाडले होते.
महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रिकरण करणेबाबत अधिनियम मध्ये नमुद प्रमाणभूत क्षेत्र बागायत जमिनीकरिता ११ गुंठे व जिरायत जमिनींसाठी २० गुंठे वरील शेतजमिनींचे दस्त नोंदणीबाबत दस्तातील लिहुण घेणार यांचे शेतकरी असल्याबाबतचे पुरावे घेऊन दस्त नोंदणी करणेबाबत पुणे जिल्हा सह जिल्हा निबंधक अनिल पारखे यांनी परीपत्रकाच्या माध्यमातुन केली आहे.
त्यानुसार हवेलीतील सर्व २७ दुय्यम निबंधक कार्यालयात ११ गुंठे पर्यंत खरेदी खते नोंदविण्यास सुरुवात झाली. तालुक्यातील खरेदी खते सुरू झाल्याने भाजप तालुकाध्यक्ष संदिप भोंडवे यांनी वाघोलीत दुय्यम निबंधक कार्यालयात जाऊन निबंधक यांचे आभार मानले आहे. या निर्णयाचे सर्वत्र जोरदार स्वागत झाले असून अर्थिक भांडवल उभे करून व्यवसाय चालविणारे डेव्हलपर्स व गुंतवणूकदारांना दिलासा मिळाला आहे.
दरम्यान, हवेली तालुक्यातील भूमिपूत्रांनी स्वतःच्या मालकी क्षेत्रात व खरेदी केलेल्या क्षेत्रात गुंठेवारीचा व्यवसाय उभा केला आहे. सर्वसामान्य नागरीकांना माफक दरात गुंठा खरेदी करण्यात मदत होऊन हक्काच्या घरात राहण्याचे स्वप्न पूर्ण होत आहे. या व्यवसायातून अनेकांना रोजगार मिळून मोठे अर्थकारण व्यवसायातून चालत आहे. मात्र मागील वर्षभर हे सर्व व्यवसाय ठप्प झाल्याने अर्थकारण मोडीत निघाले होते. अनेकांचे अर्थकारण बिघडले होते. मात्र आता खरेदीखत चालू झाल्याने हवेलीचा अडकलेला आर्थिक गाडा पुन्हा एकदा रुळावर आला आहे.