पुणे : हातात भगव्या पताका, डोक्यावर तुळस , कपाळी गोपीचंदनाचा टिळा, मुखात पांडुरंगाचे नाम व टाळ-मृदंगाच्या गजरात श्री संत योगीराज चांगावटेश्वर महाराज पालखीचे सायंकाळी ७ च्या सुमारास यवत येथे ग्रामस्थांच्या वतीने स्वागत करण्यात आले. काल गुरुवारी बोरीऐंदी येथील मुक्काम आटपून पालखीने आज सकाळी यवतकडे प्रस्थान केले.
दुपारी सहजपूर येथे विश्रांती घेत पालखी सोहळा सायंकाळी पाचच्या सुमारास दोरगे वस्ती येथे विश्रांतीसाठी थांबला. तिथे जय भवानी मित्र मंडळ व राजेंद्र व किरण या गायकवाड बंधूंच्या वतीने चहा व अल्पोपहाराची सेवा देण्यात आली. यवत विश्रामगृह जवळ सरपंच समीर दोरगे, ह.भ.प नाना महाराज दोरगे, ह.भ.प सोनबा महाराज कुदळे, युवा नेते गणेश शेळके, काश्मीरा मेहता, देवस्थान कमिटीचे कैलास दोरगे, हभप बापू रायकर, राजेंद्र महामुनी यांसह श्री काळभैरवनाथ देवस्थान ट्रस्ट व ग्रामस्थांच्या वतीने स्वागत करण्यात आले.
भगव्या पताका हातात घेत, तुळशी वृंदावनासह टाळ-मृदंगाच्या गजरात हरिनामाचा जयघोष करत संत श्री चांगावटेश्वर महाराज पालखी सोहळा सायंकाळी ०७.३० च्या सुमारास यवत येथील श्रीकाळभैरवनाथ मंदिरात विसावला व समाज आरती करण्यात आली. आरती नंतर ह.भ.प.सोनबा महाराज कुदळे यांचे कीर्तन संपन्न झाले व ग्रामस्थांच्या वतीने वारकऱ्यांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
पालखी बरोबर असलेल्या काही दिंड्या मंदिरात तर काही दंड जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विसाव्यासाठी थांबले आहेत. आज यवत येथील आठवडे बाजार असल्याने ग्रामस्थांनी, बाजारासाठी आलेल्या अनेक भाविकांनी संत श्री चांगावटेश्वर महाराजांच्या पादुकांच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती . प्राथमिक आरोग्य केंद्र खामगाव ( गाडामोडी ) यांच्या वतीने वारकऱ्यांसाठी मोफत औषध उपचाराची सोय करण्यात आली होती.