लोणी काळभोर, (पुणे) : संतश्रेष्ठ जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची पालखी पंढरपूर वरून देहू च्या दिशेने परतीच्या मार्गाने निघाली आहे. या पालखी सोहळ्याचे कदमवाकवस्ती (ता. हवेली) येथील लोणी स्टेशन परिसरात गुरुवारी (ता. २१) आगमन होताच तुकाराम महाराजांच्या पादुकाचे दर्शन घेण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.
संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे कदमवाकवस्ती ग्रामपंचायत कार्यालयाजवळ गोमाजी पाटील वाडा येथे आगमन झाले असता कदमवाकवस्तीच्या सरपंच गौरी गायकवाड, नवपरिवर्तन फौंडेशनचे अध्यक्ष चित्तरंजन गायकवाड, गणपत चावट, बाबासाहेब वामन गायकवाड, मयुर मोहन काळभोर, प्रकाश काळभोर, दिलीप काळभोर, राजेंद्र काळभोर, अरविंद काळभोर, धनंजय काळभोर, मनोज काळभोर,किरण काळभोर, शशिकांत काळभोर, अतुल काळभोर,आकाश काळभोर, माऊली काळभोर, सुहास काळभोर, सुशील काळभोर, मोहन काळभोर, संदीप काळभोर, विक्रम काळभोर, मुकुंद काळभोर, जयंत काळभोर, श्रीकांत काळभोर, यांनी मोठ्या उत्साहात स्वागत केले.
जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा लाखो भाविकांसह पालखी सोहळा देहूवरून पंढरपूरकडे आषाढी एकादशीनिमित्त गेला होता. आषाढी एकादशी झाल्यानंतर हा पालखी सोहळा पुन्हा पंढरपूर ते देहू या मार्गाकडे मार्गस्थ झाली आहे. पालखीसोबत असलेल्या वारकरी व विणकरांच्या भोजनाची व्यवस्था ग्रामस्थांनी कदमवाकवस्ती येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या पटांगणात केली होती. यावेळी हजारो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.
दरम्यान, ग्रामस्थांनी या पालखी सोहळ्याचे स्वागत आणि विणकरी यांची व्यवस्था याबद्दल पालखी सोहळा प्रमुख व विणकरी भाविकांनी समाधान व्यक्त केले. पालखीच्या पुढे दिंड्या, पाठीमागे तुळशी वृंदावन घेतलेल्या वारकरी महिला, विणेकरी सहभागी झाले होते. पालखी सोहळा सकाळी साडेआकरा वाजण्याच्या सुमारास हडपसरकडे रवाना झाला. यावेळी लोणी काळभोर पोलिसांनी ठिकठीकाणी पोलीस बंदोबस्त ठेवला होता.