लहू चव्हाण
पाचगणी : पर्यटन नगरी पाचगणीची स्वतंत्र ओळख होत असलेला कला, सांस्कृतिक कलागुणांनी नटलेला ‘आय लव्ह पाचगणी फेस्टिवल’ ची तयारी अंतिम टप्प्यात आली असून फेस्टिवल यशस्वी करण्यासाठी ‘आय लव्ह पाचगणी’ टीमने कंबर कसली आहे. स्थानिकांसह पर्यटकांना ओढ असलेला पाचगणी फेस्टिवल दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे.
फेस्टिवलची तयारी जोरदार सुरू आहे.आकर्षक रोषणाईने बाजारपेठ सजविण्यात आली असून पर्यटन नगरीकडे येणाऱ्या राज्य मार्गावर ठिकठिकाणी फेस्टिव्हलचे होर्डिंग्ज लावण्यात आले आहेत.
पालिका प्रशासनाकडून फेस्टिवलसाठी शहरातील अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात आले असून पावसाळी गटारासाठी खोदलेल्या रस्त्यांची युद्ध पातळीवर दुरुस्ती सुरू आहे.
दोन डिसेंबर रोजी या सोहळ्याचा श्रीगणेशा कै.भाऊसाहेब भिलारे स्टेडियमवर नृत्य, गायन व कलागुणांनी भरलेल्या कार्यक्रमांनी होणार आहे. कलाविष्कारांचे दर्शन घडविणारे काष्ठशिल्प, चित्रकला दुर्मिळ साहित्य अशा विविध पैलूंनी नटलेले आर्ट ॲन्ड क्राफ्ट प्रदर्शन पाचगणी क्लब येथे पहिल्या दिवसापासून खुले राहणार आहे.
टेबललॅंन्ड पठारावर आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवात रंगीबेरंगी विविध आकाराचे स्वच्छंद विहार करणारे पतंग, एरो माॅडेलिंगची प्रात्यक्षिके व पॅराग्लायडिंग डोळ्याचे पारणे फेडणार आहेत. योगा, झुंबा, मॅरेथॉन, दांडपट्टा, टग ऑफ फ्रेन्डशिप, ट्रेजर हंट आदी खेळांचा समावेश असल्याने उत्साह वाढणार असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष राजेंद्र भगत व त्यांच्या टीमने दिली.