पुणे : पिंपरी चिंचवड हद्दीत जुना मुंबई-पुणे महामार्ग बंद राहणार आहे. जुन्या पुणे-मुंबई रस्त्याचे रुंदीकरण करून या मार्गावर जलद बस वाहतूक सेवा (बीआरटी) मार्ग सुरू करण्यात येणार आहे. जुना मुंबई-पुणे महामार्ग पुणे व पिंपरी-चिंचवड शहराला जोडतो.
यासाठी ७४ कोटी ७५ लाख ८९ हजार रुपयांच्या कामाला महापालिकेच्या स्थायी समितीने नुकतीच मान्यता दिली. त्यामुळे हा रस्ता रुंद होण्याबरोबरच शहरात नवा बीआरटी मार्गही सुरू होणार आहे. वाकडेवाडी येथील अंडी उबवणी केंद्रापासून संत तुकाराम महाराज पुलापर्यंत (हॅरिस ब्रीज) ४२ मीटर रुंदीचा रस्ता अपेक्षित आहे. सद्यस्थितीत हा रस्ता केवळ २१ मीटर रुंद आहे. हा रस्ता अत्यंत वर्दळीचा असल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते.
पिंपरी-चिंचवडच्या हद्दीत दापोडी पर्यंतच्या रस्त्याचे काम पूर्ण झाले. मात्र, उर्वरित रुंदीकरणासाठी महापालिकेकडून २०१५ पासून पाठपुरावा केला जात होता. संरक्षण विभागातर्फे खडकीतील २.१ किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या भूसंपादनासाठी जागा उपलब्ध होत नव्हती. २०१६ मध्ये या रस्त्याच्या रुंदीकरणासाठी निविदाही काढण्यात आली. मात्र, भूसंपादनाअभावी रस्त्याचे रुंदीकरण सहा वर्षांहून अधिक काळ रखडले होते.
दरम्यान, सहा वर्षांनंतर संरक्षण विभागाकडून ही जागा महापालिकेच्या ताब्यात देण्यास संमती मिळाली. या पार्श्वभूमीवर महापालिकेने रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या मार्गावर काही ठिकाणी खासगी जागा मालकांकडून जमीन ताब्यात घेण्यात आली आहे, तर काहींनी टीडीआरच्या माध्यमातून नुकसानभरपाई स्वीकारण्यास मान्यता दिली आहे.
७४ कोटी ७५ लाखांची निविदा मान्य
यानंतर महापालिकेच्या पथ विभागाने या रस्त्याच्या कामासाठी सल्लागार नेमून निविदा प्रक्रिया राबविली. त्यात सर्वांत कमी दराची म्हणजे ७४ कोटी ७५ लाख ८९ हजार रुपयांची निविदा मान्य करण्यात आली. पूर्वगणनपत्रकापेक्षा ही निविदा १६ टक्क्यांनी कमी आहे. या निविदेला महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.