पिंपरी : पिंपरी-चिंचवड येथील काळेवाडी परिसरातील सराईत गुन्हेगाराने साथीदारांच्या मदतीने एका व्यक्तीवर खुनी हल्ला केला. ही घटना रविवारी (दि. २२) घडली आहे. दरम्यान, शहरातील एका बड्या नेत्याने स्थानिक पोलिसांवर दबाव टाकल्याने सराईत गुन्हेगाराचे नावच गुन्ह्यातून वगळल्याची घटना घडली आहे.
या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी संबंधित गुन्हेगाराला तत्काळ अटक करण्याचे आदेश दिले. तसेच, राजकीय दबावाला बळी पडणाऱ्या एका पोलीस अधिकाऱ्याचे तडकाफडकी निलंबन देखील केले. सचिन चव्हाण असं पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे.
नेमकं प्रकरण काय?
आरोपी प्रशांत दिघे हा पिंपरी-चिंचवड शहरातील एक कुख्यात गुन्हेगार असून त्याच्यावर खून, खुनाचा प्रयत्न, हत्यारबंदी, जबरी चोरी यांसारखे १९ गंभीर गुन्हे दाखल आहेत. रविवारी (दि. २२) रात्री काळेवाडी येथे दोन गटात हाणामारी झाली होती. यामध्ये आरोपीने एका व्यक्तीचा खून करण्याचा प्रयत्न केला. मात्र, राजकीय हस्तक्षेपामुळे पीएसआय सचिन चव्हाण यांनी त्याचे नाव गुन्ह्यातून वगळले होते.
या प्रकरणाची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना मिळताच त्यांनी तातडीने कारवाई करत चव्हाण यांना निलंबित केले. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी राजकीय दबावाला न जुमानता कठोर पावले उचलल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.