पुणे : इलेक्ट्रीक वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे पुणे शहराच्या विविध भागात १७०० चार्जिंग पाॅईंट महापालिकेने प्रस्तावित केले आहेत.
प्रादेशक परिवहन विभागाकडील आकडेवारीनुसार शहरात २९ हजार ई-वाहनांची नोंद आहे. त्यामध्येही चारचाकी वाहनांच्या तुलनेत दुचाकींची संख्या सर्वाधिक आहे. ई-वाहनांच्या तुलनेत शहरात मर्यादित स्वरूपात चार्जिंग पाॅईंट आहेत.
आता महापालिकेच्या इमारती, शाळा, नाट्यगृह, वाहनतळ, रुग्णालये उद्याने अशी ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारली जाणार आहेत. यातून एकाच वेळेस ३०० ई-मोटारींसाठी चार्जिंग उपलब्ध होणार आहे.
महापालिकेने भाडेतत्त्वावर ई-बाईक योजनेला मान्यता दिली आहे. त्याअंतर्गत विविध भागात २५० चार्जिंग पाॅईंट उभारण्यात येणार आहेत. सध्या विद्युत विभागाने ५०० ठिकाणे दिली आहेत. प्रत्येक ठिकाणी दुचाकीसाठी दोन चार्जिंग पॉइंट आणि चारचाकी वाहनांसाठी एक असेल. त्यामध्ये एक पाॅईंट वेगाने चार्जिंग करणारा तर दुसरा पाॅइंट कमी वेगाने चार्जिंग होणारा असेल.
दरम्यान, जलदगतीला सुमारे ४५ मिनिटांचा कालावधी लागणार असून कमी वेगाने चार्जिंग होण्यासाठी दोन तासांपेक्षा जास्त कालावधी लागणार आहे. त्यासाठी महापालिका खासगी कंपन्यांना जागा उपलब्ध करून देणार आहे.
कंपनीकडून चार्जिंगसाठीचे शुल्क आकारले जाईल. खासगी वाहनांसाठी शहराच्या सर्व भागात चार्जिंगची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.