पुणे : पुणे जिल्ह्यातील मातंग समाज आणि या समाजातील विविध पोटजातीतील बेरोजगार युवकांना छोटे उद्योग व व्यवसाय करण्यासाठी कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. या कर्जाचा लाभ घेण्यासाठी इच्छुकांना प्रस्ताव सादर करण्यासाठी येत्या ३० नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे.
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाच्या वतीने जिल्ह्यातील मातंग समाज आणि या समाजातील विविध पोटजातीतील बेरोजगार युवकांना छोटे उद्योग व व्यवसाय करण्यासाठी कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. यासाठी या महामंडाळाच्यावतीने इच्छुकांकडून कर्ज मागणी प्रस्ताव मागविण्यात आले आहेत.
या कर्ज योजनेअंतर्गत १ लाख रुपयांच्या प्रकल्प मूल्यांसाठी महामंडळाचा सहभाग ८५ हजार रुपये, अनुदान १० हजार रुपये, अर्जदाराचा सहभाग ५ हजार रुपये असा राहणार आहे. या कर्जासाठी ४ टक्के व्याजदर आकारला जाणार आहे. या योजनेंतर्गत कर्ज घेतलेल्या युवक किंवा युवतीने ३ वर्ष कालावधीत दरमहा प्रत्येकी २ हजार ६४५ इतका हप्ता भरणे आवश्यक आहे.
सन २०२२-२३ या आर्थिक वर्षात जिल्ह्यातील ७० जणांना प्रति युनिट १ लाख रुपयांप्रमाणे कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. एकूण उद्दिष्टांपैकी ५० टक्के महिला लाभार्थ्यांची निवड केली जाणार आहे. याचा लाभ पुणे व पिंपरी चिंचवड शहर आणि ग्रामीण भागातील युवक-युवतींना घेता येणार आहे.
या कर्ज योजनेचा लाभ हा मातंग समाजातील युवक-युवती आणि या समाजातील मांग, मातंग, मिनीमादिग, मादींग, दानखणी मांग, मांग महाशी, मदारी, राधेमांग, मांगगारुडी, मांग गारोडी, मादगी व मादिगा या १२ पोट जातींमधील युवक युवतींना घेता येणार आहे.
याचा लाभ घेण्यासाठी कर्ज मागणी करणारा अर्जदार युवक किंवा युवती ही पुणे जिल्ह्यातील रहिवासी असणे आणि त्याचे वय किमान १८ वर्षे कमाल ५० वर्ष असणे अनिवार्य आहे. संबंधित युवकाचा सीबील स्कोअर हा कमीत कमी ५०० असणे बंधनकारक आहे.
अर्ज येथे करा
या कर्ज योजनेचा लाभ घेण्यासाठी शहर व जिल्ह्यातील इच्छुक युवक-युवतींनी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, सर्वे नंबर १०३,१०४ मेंटल कॉर्नर, विश्रांतवाडी पोलिस स्टेशनसमोर, येरवडा, पुणे दूरध्वनी (०२०) २९७०३०५७ येथे संपर्क साधावा. याच कार्यालयातून विहित नमुन्यातील अर्ज व याबाबतच्या अटी व शर्तींची माहिती मिळू शकणार आहे.