पिंपरी : पिंपरी-चिंचवडतून जाणारा पुणे – नाशिक महामार्गावसह इंडस्ट्रिअल ॲन्ड रेसिडेंन्सिअल कॉरिडॉरमधील दिवसेंदिवस वाढणारा वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी समाविष्ट गावांमधील मुख्य रस्त्यांना पर्यायी रस्त्यांचे जाळे निर्माण करुन वाहतूक सुरळीत आणि सक्षम करावी. त्यासाठी महापलिका प्रशासनाने ताताडीने नियोजन आराखडा तयार करावा, अशा सूचना भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी केल्या आहेत.
याबाबत महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला असून, लवकरच नियोजन आराखडा तयार करण्याचे आदेश संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत.
समाविष्ट गावांमध्ये पायाभूत सोयी-सुविधा सक्षम करण्यावर भर देण्यात आला असून, त्यामुळे प्रचंड नागरीकरण वाढले आहे. परिणामी, पुणे – नाशिक महामार्गासह भोसरी विधानसभा मतदार संघातील तळवडे ते मोशी पट्टयामध्ये नियमित वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे.
आगामी ५० वर्षांत वाढती लोकसंख्या आणि वाढते नागरीकरण याचा विचार करता मुख्य रस्त्याला जोडणारे पर्यायी मार्गांचे जाळे निर्माण केल्यास मुख्य रस्त्यावरील ताण कमी होणार आहे.
पुणे – नाशिक महामार्गावरील वाहतूक कोंडी कमी करण्याच्या हेतूने चिखलीमधील साने चौक ते चिखली हा रस्ता २४ मीटर रुंद करावा. चिखली गाव ते सोनवणेवस्ती मार्गे ज्योतिबानगर, तळवडे या रस्त्याचे २४ मीटर रुंदीकरण करावे. तसेच, नव्याने विकसित करण्यात येणारा कॅनबे चौक, तळवडे ते रेडझोनमधून भक्ती-शक्ती चौकाला जोडणारा रस्ता १८ मीटर रुंद करावा.
इंद्रायणी नदी पात्रालगत तळवडे ते चिखली हा सध्या १२ मीटर असलेला रस्ता २४ मीटर रुंद करण्यात यावा. तसेच, चिखली- तळवडे शिव रस्ता विकसित करण्यात यावा. त्यासाठी भूसंपादन प्रक्रियेला गती द्यावी, अशा सूचना आमदार लांडगे यांनी केल्या आहेत.
पर्यायी रस्त्यांद्वारे मुख्य रस्त्याचा ताण कमी करावा…
आमदार महेश लांडगे म्हणाले की, पिंपरी-चिंचवडचे वाढते शहरीकरण आणि चाकण औद्योगिक पट्टा, तळवडे आयटी पार्क परिसरातील वाढती वाहतूक कोंडीचा सामना केल्याशिवाय कोणत्याही चाकण, नाशिकहून येणाऱ्या वाहनचालकाला पुणे शहरात जाता येत नाही, ही आजची स्थिती आहे. गेल्या १५ ते २० वर्षांत आवश्यक उपाययोजना करणे अपेक्षीत होते. मात्र, तसे झाले नाही.
गेल्या चार-पाच वर्षांत या भागातील अंतर्गत रस्त्यांची कामे हाती घेतल्यामुळे काहीप्रमाणात वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत झाली आहे. मात्र, आगामी ५० वर्षांत शहराचे नागरीकरण लक्षात घेता पुणे – नाशिक महामार्गावरील वाहतूक अन्य पर्यायी रस्त्यांवर वळवणे अत्यावशक आहे.
केवळ मुख्य रस्त्याचे रुंदीकरण करुन चालणार नाही, तर पर्यायी रस्ते निर्माण करुन त्या-त्या भागातील वाहतूक अन्य मार्गावर सुरू करुन मुख्य रस्त्याचा ताण कमी करता येईल, असा दावा आमदार महेश लांडगे यांनी केला आहे.