लहू चव्हाण
पाचगणी : पाचगणी शहराचा नावलौकिक वाढावा व स्थानिक भूमीपूत्रांना व्यवसायाची संधी उपलब्ध व्हावी यासाठी आयोजित करण्यात येणाऱ्या ‘आय लव्ह पाचगणी’ फेस्टिवलची समारोपाची संध्याकाळ पर्यटक व नागरिकांच्या उत्साहामुळे चांगलीच बहरली होती. सांगता समारंभाच्या कार्यक्रमाला जननायक आमदार मकरंद पाटील यांनी हजेरी लावत उपस्थित जनसमुदायाशी संवाद साधला.
दि.२ ते ४ डिसेंबर दरम्यान आयोजित केलेल्या तीन दिवसीय फेस्टिव्हला शहर व परिसरातील नागरिकांबरोबर हजारों पर्यटकांनी हजेरी लावली होती. पाचगणी कल्ब येथील आर्ट गॅलरी व जुन्या मोटारसायकल पाहण्यासाठी विविध शाळेतील विद्यार्थ्यांबरोबरच पर्यटक नागरिकांनी गर्दी केली होती.
टेबल लॅंन्ड पठारावर पतंग महोत्सवात हवेत झेप घेत जेट्स, फायटर्स अशा छोट्या इंजिनवर उडणारी व बॅटरीवर उडणारी विमाने ही सर्व रिमोट द्वारे नियंत्रित करताना पर्यटकांना एक न्यारा आनंद मिळत होता.
मुख्य बाजारपेठेत आयोजित केलेल्या खाऊ गल्लीत असंख्य खाद्य प्रेमींनी विविध खाद्यपदार्थांचा आस्वाद घेत वॉकिंग प्लाझाबरोबर लाईव्ह बँडचा आनंद घेतला. छत्रपती शिवाजी महाराज चौकात मंचावर सदाबहार गाण्यांची मैफल रंगली होती.पहिल्या दिवशी सायंकाळी पाच वाजता कै. भाऊसाहेब भिलारे स्टेडियमवर विविध शाळेतील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांने उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले.
शेवटच्या दिवशी रस्सीखेचच्या चुरशीच्या सामन्यामुळे प्रेक्षकांचा आनंद द्विगुणित झाला. मोठ्या जल्लोषात सुरू झालेल्या ‘आय लव्ह पांचगणी’या फेस्टीवलची हजारों नागरिकांच्या उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात काल रात्री सांगता झाली.