राहुलकुमार अवचट
यवत : ग्रामीण रस्त्यांसाठी शासनाने भरीव निधी उपल्बध करून द्यावा. आस्तित्वात असणाऱ्या परंतु नकाशावर नसलेल्या रस्त्यांच्या कामासाठी शासनाने विशेष कार्यक्रम राबवावा, ग्रामीण रस्ते सुधारणेसाठी शासनाने वेळोवेळी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करावी. व ग्रामीण रस्त्यांसाठी धोरणात्मक निर्णय घ्यावा. अशी मागणी दौंडचे आमदार राहुल कुल यांनी केल्या आहेत.
दौंडचे आमदार राहुल कुल यांनी विविध मागण्या विधानसभेत केल्या आहेत. यावेळी कुल यांनी ग्रामीण भागातील रस्त्यांच्या दुरावस्थेकडे तसेच भूमिहीनांच्या निवासी अतिक्रमणाच्या प्रश्नाकड़े सभागृहाचे लक्ष वेधले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या नेतृत्वाख़ालील मागील युती शासनाच्या काळात भूमिहीनांची शासकीय जमिनीवर निवासी अतिक्रमणे नियमित करण्याचा निर्णय झाला. परंतु अद्याप त्यावर समाधानकारक कार्यवाही झाली नाही. तेव्हा भूमिहीनांची शासकीय जमिनीवरील विशेषतः गायराणातील निवासी अतिक्रमणे नियमित करावी. यासाठी शासनाने कार्यवाही करावी. अशी मागणी आमदार कुल यांनी केली
स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतर देखील राज्यातील अनेक ग्रामपंचायतीमध्ये स्मशानभूमी, दफनभूमी, दशक्रिया घाट यांसारख्या मूलभूत सुविधांचा अभाव आहे त्याकरता शासनाकडून थोडा फार निधी मिळत जरी असला तरीही या मूलभूत सुविधांसाठी शासनाने व्यापक धोरणात्मक निर्णय घ्यावा, राज्यातील अनेक ग्रामपंचायतींकडे सुस्सज ग्रामपंचायत इमारतीचा अभाव आहे.
राज्यातील सुमारे २७००० ग्रामपंचायतींचा विचार करून शासनाने निधीची तरतूद करावी व याबाबत कालबद्ध कार्यक्रम हाती घ्यावा. अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर्स आदी यांना मिळणारे मानधन अतिशय तुंटपुजे असून त्यांच्या मानधनामध्ये शासनाने वाढ करावी, त्यांचे विविध प्रश्न सोडविण्यात यावे.
राज्यातील अनेक ठिकाणी प्राथमिक शाळांच्या इमारती या जुन्या व जीर्ण झाल्यामुळे लहान मुलांना धोकादायक इमारतींमध्ये शिक्षण घ्यावे लागत आहे. प्राथमिक शाळांच्या दुरावस्थेबाबत प्रश्न उपस्थित केला, प्राथमिक शाळांच्या इमारतींसाठी कुठलीही ठोस योजना नसल्याने अनेक ठिकाणी मागणी असून देखील खूप कमी प्रमाणावर शाळांच्या खोल्यांची बांधकामे मंजूर होतात, डागडुजी केली जाते. राज्यस्तरावर धोरणात्मक निर्णय घेण्याची आवश्यकता आहे.
तसेच प्राथमिक शाळांच्या वीजबिलाबाबत निर्णय घेण्यात यावा. महानगरपालिकांमध्ये समाविष्ट झालेल्या गावांतील प्राथमिक शाळांतील शिक्षकांच्या बाबत अजूनही अनिश्चितता असून त्याबाबत देखील शासनाने निर्णय करावा. अशा विविध मागण्या दौंडचे आमदार कुल यांनी विधानसभेत केल्या आहेत.