सोलापूर : अकलूज येथील दोन जुळ्या बहिणींचा विवाह करणाऱ्या नवरदेवाला न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला असून जोपर्यंत पहिला जोडीदार तक्रार दाखल करत नाही तोपर्यंत गुन्हा दाखल होऊ शकत नाही. असे न्यायालयाने म्हटले आहे.
अतुल उत्तम अवताडे या महाळुंग परिसरातील गट नंबर २ मध्ये राहणाऱ्या तरुणाने शुक्रवारी (२ डिसेंबर) अकलूज जवळील गलांडे हॉटेलमध्ये रिंकी आणि पिंकी मिलिंद पाडगावकर या दोन जुळ्या बहिणींशी विवाह केला होता. याप्रकरणी माळेवाडी येथील राहुल फुले यांनी याबाबतची तक्रार दाखल केल्यावर पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल करून कारवाईला सुरुवात केली होती.
नवरदेवाने जुळ्या बहिणीसोबत एकाच मांडवात विवाह केल्याने कलम ४९४ अंतर्गंत हे लग्न येत नाही. त्यांनी कायद्यातून पळवाट काढत हा विवाह केला आहे. तसंच, एकत्र लग्न झाल्याने पत्नीच्या विरोधाचा प्रश्नच नाही त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊ शकत नाही. जोपर्यंत पहिला जोडीदार तक्रार दाखल करत नाही तोपर्यंत गुन्हा दाखल होऊ शकत नाही. मात्र, या लग्नाची कायदेशीर नोंद होत आहे. दुसरे लग्न हे वैध ठरत नाही.
दरम्यान, मुंबईतील कांदिवली येथून पिंकी आणि रिंकी या जुळ्या बहिणींनी आयटी इंजिनीयरिंग केले. नवरदेव अतुल अवताडे हा महाळुंग (ता. माळशिरस) येथील असून, त्याचा मुंबई येथे ट्रॅव्हल्सचा व्यवसाय आहे. पिंकी आणि रिंकीला एकमेकींबद्दल अतिशय ओढा आहे.
बालपणापासून एकत्र राहत असलेल्या दोन्ही बहिणींना शेवटपर्यंत सोबतच राहायचे आहे. त्यामुळेच त्यांनी एकाच तरुणाशी विवाह करण्याचा निर्णय घेतला होता. अवताडे आणि पाडगावकर कुटुंबाने या विवाहास मान्यता दिली होती.