पुणे : पॅनकार्ड क्लब कंपनीची वारंवार बंद पडणारी वेबसाईट व ग्रामीण भागातील नागरिकांची होणारी गैरसोय या गोष्टींचा विचार करून दावे दाखल करण्याची मुदत ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत वाढवावी अशी मागणी शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
पॅनकार्ड क्लब कंपनीने शिरूर मतदारसंघातील जुन्नर, आंबेगाव, शिरूर, खेड, हवेलीसह हडपसर व भोसरी मधील नागरिकांच्या पैशांचा दुरुपयोग करून त्यांची फसवणूक केली आहे. असे प्रकार देशभरात अनेक ठिकाणी घडले आहेत. सदर कंपनीविरोधात मुंबई उच्च न्यायालयाने संबंधितांना शुक्रवार (ता. २३) पर्यत दावे दाखल करण्याची मुदत दिली होती.
परंतु या फसवणूक प्रकरणाची व्याप्ती व गुंतवणूकदारांची मोठी संख्या बघता, तसेच वारंवार बंद पडणारी वेबसाईट व ग्रामीण भागातील नागरिकांची होणारी गैरसोय या गोष्टींचा विचार करून दावे दाखल करण्याची मुदत ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत वाढवावी अशी मागणी केली आहे.
दरम्यान, जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर तालुक्यातील ठेवीदारांसाठी IRP प्रतिनिधी नेमण्याचे निर्देश द्यावे, या सर्व गोष्टींचा सारासार विचार करून यासंदर्भात तत्काळ निर्देश देण्याची मागणी शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.