अकोला : पोलिस महिलेचा पती समलिंगी असल्याची धक्कादायक बाब अकोला जिल्ह्यात उघडकीस आली आहे. पतीच्या मोबाईल फोनवरील मित्रासोबत असलेले आक्षेपार्ह चॅट्स पाहून पत्नीच्या पायाखालची जमीन सरकली. सासरच्या मंडळींकडून पैशांसाठी जाच आणि नंतर पतीचं समलिंगी असणं या दोन्ही गोष्टींचा महिलेला भरपूर मानसिक त्रास झाला आहे. या प्रकरणी महिलेनं बाळापूर पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद नोंदवली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पोलीस कर्मचारी महिलेसोबत एक अनेपक्षित घटना घडली आहे. सुरवातीला सासरवास आणि नंतर पतीचे परपुरूषांसोबत शारीरिक संबंध असल्याची माहिती पोलीस कर्मचारी महिलेला मिळाली. या दोन्ही गोष्टींमुळे महिला मानसिकरित्या पूर्ण खचली आहे. या महिलेचं लग्न अडीच वर्षांपूर्वी बार्शीटाकळी तालुक्यातील एका युवकाशी झालं होतं. लग्नानंतर काही दिवस उलटून गेले. नंतर सासरच्या मंडळींनी त्रास द्यायला सुरूवात केली.
सासरच्या मंडळींकडून काही ना काही कारणावरून शारीरिक आणि मानसिक छळ करण्यात येत होता. पतीनं आणि सासरच्या लोकांनी घर दुरूस्तीसाठी महिलेकडे १ लाख आणि शेतीचे कर्ज फेडण्यासाठी २ लाख, एकूण ३ लाख रूपये मागितले होते. तिने ते पैसे दिलेही. पण त्यानंतरही सासरच्या लोकांनी ५ लाखांची मागणी केली.
याच जाचाला कंटाळून पती आणि महिला दोन्ही अकोला शहरातील पोलीस वसाहतीत राहायला गेले. पती मोबाईल चार्चला लावून बाहेर गेला होता. एके दिवशी महिलेनं असचं पतीचा मोबाईल फोन तपासण्यासाठी घेतला. महिलेनं मोबाईल तपासला असता, महिलेच्या पायाखालची जमीन सरकली. पतीचे पुरूष मित्रासोबत असलेले आक्षेपार्ह मेसेज पाहून पत्नीला मोठा धक्काच बसला.
याबाबत तिनं पतीला जाब विचारले असता, त्यानं समलिंगी असल्याचं मान्य केलं. तसेच फक्त पैशांसाठी लग्न केलं असल्याचंही त्याने सांगितलं. या प्रकणानंतर महिलेनं बाळापूर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी कौटुंबिक हिसांचाराच्या कायद्यानूसार गुन्हा दाखल केला आहे. तसेच पोलिसांकडून महिलेच्या सासरकडील ५ जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.