हडपसर : हडपसरवरून वाघोलीकडे जाणाऱ्या मांजरी ग्रामपंचायत हद्दीतील मुळा-मुठा पुलावरून पाणी वाहत आहे. तरीही वाहनांची वाहतूक सुरू आहे. अतिवृष्टी व दमदार पावसामुळे पाणी भरपूर आले असून, या ठिकाणी धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. तरीही नागरीक स्वत:चा जीव धोक्यात घालून पूल ओलांडत असताना दिसून येत आहेत. त्यामुळे सदर ठिकाणी अपघाताची दुर्घटना घडण्याचा धोका असल्याने नागरिकांनी तातडीने वाहतूक बंद करावी असे आवाहन खडकवासला पाटबंधाऱ्याच्या अधिकाऱ्याकडून करण्यात येत आहे.
खडकवासला धरण पूर्ण क्षमतेने म्हणजे १०० टक्के भरले असल्याने धरणाच्या सांडव्यातून बुधवारी (ता. १३) दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास १३ हजार १३८ क्युसेक पाणी सोडले आहे. त्यामुळे मांजरी येथील मुळा-मुठा नदीवर असलेल्या पुलावरून पाणी वाहत आहे. या पाण्यातून काही बेजाबदार नागरिक बिनधास्तपणे चारचाकी वाहनांची वाहतूक सुरू झाली आहे. त्यामुळे दुर्घटना घडण्याची धोका आहे.
पावसाळ्यात दरवर्षी हा पूल पाण्याखाली जात असून काही नागरिकदेखील पुलावरून वाहून गेल्याच्या घटनादेखील घडलेल्या आहेत. हा पूल पाण्याखाली गेल्याने नागरिकांनी धोकादायक वाहतूक करू नये, यासाठी या पुलावरील वाहतूक काही काळ बंद करणे गरजेचे आहे. मागील चार ते पाच दिवसापासून पुणे शहरसह परिसरात जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे अनेक दुर्घटना घडत आहेत. अशावेळी वाहनचालकांनी काळजी घेतली पाहिजे.
दरम्यान, मांजरी ग्रामपंचायत हद्दीतील मुळा-मुठा या नदीच्या पुलावर पावसाळ्यात नेहमीच वाहतुकीसाठी पूल बंद होतो. त्यामुळे मांजरी, हडपसर व वाघोली कडे जाणारे व येणाऱ्या नागरिकांना येण्या-जाण्यसाठी एकच पूल आहे. त्यामुळे हजारो नागरिक या पुलाचा वापर करीत आहेत. तसेच या भागातील अनेक ग्रामस्थ हे हडपसर या ठिकाणी नोकरीसाठी येतात. त्यामुळे नेहमी पुलावरूनच अनेकांना या पुलावरून येणे-जाणे करावे लागते. त्यामुळे पुलावरील वाहतूक काही काळ बंद करणे गरजेचे आहे