शिक्रापूर : शिरूर तालुक्यातील तळेगाव न्हावरा रोड (NH548D) वर न्हावरे दिशेने जाणारी भरधाव वेगात असलेली( Hundai i 20)कार निमगाव फाट्याजवळ गलांडे फार्म हाऊस समोर चालकाचे नियंत्रण सुटल्याने उलटल्याची घटना सायंकाळी चार च्या सुमारास घडली आहे. या घटनेत दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात एवढा भीषण होता की कार रोड पासून सुमारे शंभर फुट अंतरावर जाऊन उलटली. या अपघातात आय ट्वेन्टी कारचे पूर्णतः नुकसान झाले आहे.
या घटनेच्या ठिकाणी बाजूलाच राहत असलेले संदीपआप्पा भंडारे, योगीराज धुमाळ, सुखदेव ढोरे, पुरुषोत्तम घोलप, दीपक वडघुले, बाबासाहेब दौंडकर यांनी तातडीने ॲम्बुलन्सला कॉल करून उलटलेली कार सरळ केली व जखमी व्यक्तींना कारमधून बाहेर काढून हॉस्पिटलमध्ये पोहोचवण्यास मदत केली.
दरम्यान या रोडवर दररोज अपघाताचे सत्र सुरूच आहे. या 24 किलोमीटरच्या अंतरामध्ये एकही गतिरोधक नसल्याने, वाहने अतिशय वेगाने चालतात तसेच या रोडला वळणे अधिक असल्याने चालकांना त्याचा अंदाज येत नाही, त्यामुळे अपघात घडण्याचे प्रमाण जास्त आहे. या रोडवर ठिकठिकाणी गतिरोधक बसवा अशी मागणी लोक करत आहेत.