पुणे : राज्यात सद्या आगामी विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु असून अनेक नेते दावे प्रतिदावे करताना दिसत आहेत. अशातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज बारातमी लोकसभा निवडणुकीच्या निकालाबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात खासदार सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यात लोकसभेची लढत झाली होती. या लढतीत सुप्रिया सुळे यांचा विजय झाला होता. या निकलावर आज पुन्हा एकदा अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
“मागं जाताना मी फार जोरात जायचो. लोकसभेचा निकाल थोडा वेगळा लागला. बारामतीकरांनी ठरवलं होतं खासदारकीला ताईंना निवडून द्यायचं. त्यामुळे बऱ्याच घरातले काही काही तर म्हणायचे, आमचे चार मते आहेत. दोन दादांना दोन साहेबांना. काहींनी तर चारहीचे चारही मते साहेबांना असंही केलं. पण आता पुढं कुणाला संधी द्यायची ते तुम्ही बघा. परंतु हे झालं आहे. ते नाकारू शकत नाही. अल्पसंख्याक समाज माझ्यापासून दूर गेलेला पाह्यला मिळाला”, असं अजित पवार म्हणाले.
“महाराष्ट्र शासनाने बळीराजा मोफत वीज योजनेअंतर्गत एप्रिल, मे जूनचं चालू वीज बिलाचा पहिल्या हप्त्याचा भरणा सरकारने केलं आहे. वीज बिलमाफ केलं म्हणजे १४ हजार ९०० कोटी रुपये आम्ही महावितरणला भरले. त्यामुळे वीज बिल माफ केलं. या योजनेनुसार तुम्हाला झिरो बिल दिलं जाईल. तुम्ही पुन्हा महायुतीचं सरकार आणा. काही लोकांना वाटतं पुढे काय? तर ते तुमच्या हाती आहे. जिथे घड्याळ असेल तिथे घड्याळाला, जिथे कमळ असेल तिथे कमळाला आणि जिथे धनुष्यबाण असेल तिथे धनुष्यबाणाला बटन दाबलं तर तुम्हाला पुढेही झिरो बिल दिलं जाईल”, असे अजित पवार म्हणाले.
तुम्ही माझ्या टर्म आठवा ; अजित पवार
“तुम्ही माझ्या टर्म आठवा. मला पाच वर्षात तीनच वर्ष काम करायला मिळाली. एक वर्ष विरोधी पक्षात गेले. एक वर्ष कोरोनात गेलं. तीन वर्षात मी काही हजार कोटी बारामतीसाठी आणले. सर्व घटकांसाठी पैसे आणले. तुमच्यामुळे यश मिळालं. यावेळी पहिल्यांदा बारामतीत असे स्पॉट डेव्हल्प केले आहेत. परवा ९६ कोटींची योजना मंजूर करण्यात आली. अजूनही काही गोष्टी करणार आहे. पण मन लावून काम केलं पाहिजे”, असे अजित पवार यांनी सांगितले.
त्यांना नालायकच म्हटलं पाहिजे ना..
“जिथं चुकीचं असेल ते बारामतीकरांनी सांगावं. तुमचं नाव गुपित ठेवतो. आपली नवीन पिढी बरबाद करत आहेत. वाईट वाटून घेऊ नका. आम्ही मध्ये सर्व्हे केला. या प्रकाराला १०० टक्क्यातील ६० ते ७० टक्के प्रकार घरातील माणसं करत आहेत. घरातील नातेवाईक करत आहेत. आलेल्या तक्रारीवरून हे सिद्ध झालं आहे. त्यामुळे आपल्यापासून सुरुवात केली पाहिजे. महिलांची काळजी घ्या. शेवटी प्रत्येकाच्या घरात आया बहिणी असतात. काही तर इतके नराधम, विकृत आणि नालायक माणसं असतात. मुलीशीही संबंध ठेवायला कमी पडत नाहीत. त्यांना नालायकच म्हटलं पाहिजे ना”, असं परखड मत अजित पवारांनी मांडलं.