पुणे : हिंदवी स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीसमोर असलेल्या वाघ्या कुत्र्याच्या स्मारकावरून वाद सुरु आहे.रायगड प्राधिकरण समितीचे अध्यक्ष आणि छत्रपती घराण्याचे वंशज संभाजीराजे छत्रपती यांनी वाघ्या कुत्र्याची समाधी हटवण्याची मागणी केली आहे. या वादात शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे गुरुजी यांनी उडी घेत वाघ्या कुत्र्याच्या समाधीची कथा सांगितली. हा वाद सुरु असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी किल्ले रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या समाधीसंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी किल्ले रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या समाधीसंदर्भात समिती नेमणार असल्याची माहिती संभाजीराजे छत्रपती यांनी दिली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासात कुठंही वाघ्या कुत्र्याचा उल्लेख आढळत नाही. सर्व इतिहासकारांनी देखील हे स्पष्टपणे सांगितले आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली असून लवकरच समिती गठित होणार असल्याचं संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितलं. आज शिवपुण्यतिथी निमित्त संभाजीराजे यांनी किल्ले रायगडला भेट देवून शिवाजी महाराजांच्या समाधीला अभिवादन केलं. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली.
किल्ले रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधी शेजारी असलेल्या वाघ्या कुत्रा नामक पात्राचा शिवकालीन इतिहासात कुठलाही उल्लेख किंवा संदर्भ सापडत नाही. त्यामुळे अशा प्रकारे कपोलकल्पित कुत्र्याचा पुतळा किंवा समाधी उभारणं, ही छत्रपती शिवाजी महाराजांशी घोर प्रतारणा असल्याचं संभाजीराजे यांचे म्हणणे आहे.