पुणे : पुण्यात लम्पी आजारामुळे दगावलेल्या २९२ जनावरांच्या मालकांना प्रशासनाच्या वतीने आर्थिक मदत देण्यात आली आहे.
जिल्ह्यात लम्पीचा प्रादुर्भाव कमी होत आहे. बाधित दर कमी झाला असून बाधित जनावरांची संख्या ७६२९ एवढी झाली आहे. आतापर्यंत ८ लाख ३२ हजार ९१२ जनावरांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. जिल्ह्यातील लम्पी आजार नियंत्रणात असल्याने नगर आणि सातारा जिल्ह्यासाठी पाच डॉक्टरांना जिल्हा परिषदेकडून पाठविण्यात आले आहे. साखर कारखान्यांवर असलेल्या जनावरांसाठी कारखाना प्रशासनाला खबरदारीच्या उपाययोजना घेण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.
जिल्हा परिषदेकडून कारखान्यांवरील जनावरांचे देखील लसीकरण करण्यात आले आहे. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात लम्पीचा प्रादुर्भाव दिसत असून जिल्ह्यातील इतर तालुक्यांच्या तुलनेत इंदापूर, खेड आणि बारामती तालुक्यात बाधा होण्याचे प्रमाण जास्त आहे, अशी माहिती जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. शिवाजी विधाटे यांनी दिली.
लम्पीमुळे जनावरे दगावलेल्या पशुपालकांना आर्थिक साहाय्य देण्यात येत आहे. आतापर्यंत २९२ पशुपालकांना आर्थिक साहाय्य दिले असून उर्वरित जणांना लवकरच दिले जाईल. यापूर्वी लसीकरणामध्ये लहान वासरांना लस देण्यात आलेली नाही. मात्र, आता लहान वासरांचे देखील लसीकरण सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे पशुपालकांनी त्यांच्याकडील लहान वासरांचे देखील लसीकरण करून घ्यावे. असेही विधाटे यांनी सांगितले.
दरम्यान, लम्पी रोगाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यासापूसन आतापर्यंत जिल्ह्यात ३०१ जनावरांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी २९२ जनावरांच्या मालकांना प्रशासनाकडून आर्थिक मदत देण्यात आली आहे. उर्वरित पशुपालकांच्या कागदपत्रांमध्ये त्रुटी आढळल्या असून, त्या दूर करून त्यांनाही आर्थिक साहाय्य दिले जाणार आहे. असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.