नाशिक : नाशिकच्या पेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील ननाशी गावात एक खळबळजनक घटना घडली आहे. पूर्ववैमनस्यातून गावच्या प्राथमिक आरोग्य केंद्रा नजीक एकाचे मुंडके छाटण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे छाटलेले मुंडके आणि हत्यारासह आरोपी पोलीस स्थानकात हजर झाला आहे.
नववर्षाची सुरवात खुनी हल्ल्याने झाल्याने दिंडोरी तालुक्यासह नाशिक जिल्हा हादरून गेला आहे. गुलाब वाघमारे असं हत्या करण्यात आल्याचे नाव आहे. ही घटना आज (दि. १) सकाळी सव्वा दहाच्या सुमारास घडला आहे.
नेमकं काय घडलं?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुलाब रामचंद्र वाघमारे, सुरेश बोके आणि विशाल बोके यांचे काही कारणावरून गेली दोन वर्षापासून वाद सुरु होते. या वादाच्या कारणावरून वाडीवऱ्हे पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल करण्यात आली होती. मात्र, आज नववर्षाच्या सकाळीच गुलाब वाघमारे, सुरेश बोके आणि विशाल बोके याच्यांत पुन्हा वाद उफाळून आला.
दरम्यान, सुरेश बोके, विशाल बोके यांनी थेट गुलाब वाघमारे यांचे मुंडके कुऱ्हाडीने धडावेगळे केले. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. धक्कादायक बाब म्हणजे बोके बंधूंनी मयत वाघमारेचे मुंडके व हत्यार घेऊन सिनेस्टाईल पद्धतीने ननाशी पोलीस ठाण्यात दाखल झाले. या घटनेने ननाशीत तणावाची स्थिती निर्माण झाली आहे.