अजित जगताप
सातारा : अलिकडच्या काळात सामाजिक बांधिलकी लोप पावली आहे. सरकारी -निमसरकारी असो की, सार्वजनिक ठिकाणी नुकसान करणे हे अनेकांना जन्म सिध्द हक्क वाटत असतो. अशा वेळी वडूज ता. खटाव येथील रस्त्याच्या कडेला खड्डे मुजवून भर पावसात ‘एक युवक’ सामाजिक बांधिलकी शिकवून गेला.
याबाबत माहिती अशी की, वडूज बस स्थानक शेजारी हॉटेल विजय समोरील रस्त्यावर डोंबारी समाजाची युवकाने रस्सी वरील खेळ सुरू केला होता. त्यासाठी रस्त्याच्या एका बाजूला कळकाचे दोन खांब रोवले होते. अर्धा ते पाऊण तास रस्सी वरील कवायत करून उदरनिर्वाहासाठी जीवाची पर्वा न करता खेळ दाखवित होता. इतक्यात पाऊस सुरू झाल्याने बिचाऱ्याने नाईलाजाने खेळ थांबविला. आपला बोजा बिस्तरा उचलण्यापूर्वी रस्त्यावर केलेले खड्डे मुजविण्याच्या यशस्वीपणे प्रयत्न केला.
छत्तीसगड याठिकाणाहुन आलेला दिलप्रसाद, करणं, शकिना हे आजच सातारा जिल्ह्यात आले होते. सध्या दहिवडी येथे पाल टाकून रहात आहेत. गेली तीन वर्षे ते डोंबाऱ्याचा खेळ करून स्वाभिमानाने जीवन जगत आहेत. जीवावर उदार होऊन खेळ करताना बघणाऱ्या लोकांचा काळजाचा ठोका चुकतो, पण, पोटाची खळगी भरण्यासाठी त्यांना दररोज सकाळी लवकर उठून कसरत करावी लागत आहे.त्यानंतरच त्यांच्या हातातोंडाची गाठ पडत आहे.
अलिकडच्या काळात सार्वजनिक रस्त्यावर कधी उदघाटन, स्वागत कमानी,वाढदिवसाच्या शुभेच्छा, विजयी उमेदवारांचे कौतुक, खाजगी दुकानाच्या जाहिराती यासाठी मोठ्या प्रमाणात रस्त्याची खोदाई केली जाते. काही वेळा पाईपलाईन टाकण्यासाठी चांगल्या रस्त्याची वाट लावली जाते. नंतर त्याकडे कोणी लक्ष देत नाहीत. अशा वेळी तासभरच्या डोंबाऱ्याचा खेळासाठी रस्त्याच्या कडेला दोन इंचाचा खड्डा सुध्दा व्यवस्थितरित्या मुजविण्याच्या काम करणारे खरी सामाजिक बांधिलकी जपतात. हे सुध्दा चांगलेच जाणविले आहे.या त्यांच्या कामगिरीबद्दल अनेकांनी त्याचे मनापासून कौतुक केले आहे. त्यांचा आदर्श इतरांनी जरूर घ्यावा असे ही सूचित केले आहे.
दरम्यान, वडूज नगरपंचायती समोरच काही महाभाग फुकटच्या जाहिराती करून खुलेआम महसूल बुडवत आहेत. तर काहीजण सार्वजनिक रस्ता आणि शासकीय कार्यालयाचा उपयोग वाहन पार्किंग साठी करीत आहेत. याबाबत आता ठोस निर्णय घेण्यात यावा अशी मागणी यानिमित्त होऊ लागली आहे.