पुणे : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या ठाकरे गटाला जोरदार गळती लागली आहे. शिंदेंच्या ऑपरेशन टायगर अंतर्गत ठाकरे गटातील महत्वाचे नेते, पदाधिकारी, नेत्या आता शिवसेनेच्या गळाला लागले आहेत. रवींद्र धंगेकर यांच्यानंतर आता पिंपरी चिंचवड मधील फायर ब्रँड नेत्या सुलभा उबाळे शिंदेंच्या शिवसेनेच्या गळाला लागल्या आहेत. त्यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.
शिवसेना ठाकरे गटातील फायर ब्रँड म्हणून ओळख असलेल्या शिरूर लोकसभेच्या जिल्हा संघटीका आणि माजी विरोधी पक्षनेत्या सुलभा उबाळे यांनी शिवसेना उबाठाला जय महाराष्ट्र करत शिंदें पक्षाचा धनुष्यबाण हाती घेतला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये त्यांचा हा पक्षप्रवेश पार पडला.
1977 मध्ये पहिल्यांदा महापालिकेवर सुलभा उबाळे या निवडून आल्या होत्या. त्यानंतर तीन वेळा त्यांनी नगरसेविका आणि विरोधी पक्षनेत्या म्हणून कामकाज पाहिले.यमुनानगर महिला मंडळ,दामिनी ब्रिगेड तसेच बचत गटाच्या माध्यमातून त्यांनी मोठं काम देखील केल आहे. नुकत्याच झालेल्या हवेली तालुक्याच्या विभाजनानंतर भोसरी विधानसभेसाठी त्या तत्कालीन आमदार विलास लांडे यांच्या विरोधात रिंगणात उतरल्या.मात्र केवळ 1200 मतांनी त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.
दरम्यान याआधी माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी सुद्धा शिवसेना एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला आहे. महाविकास आघाडीतून बरेच पदाधिकारी सत्ताधारी महायुतीत येण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यामुळे आगामी काळात महाविकास आघाडीतील घटक पक्षांना मोठा धक्का बसणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे