पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून टीईटी २०२४ परीक्षेची अंतिम उत्तरसूची प्रसिद्ध करण्यात आली आहे. जे विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत, त्यांना परीक्षा परिषदेचे अधिकृत संकेतस्थळ http://mahatet.in वर पीडीएफ स्वरूपात उत्तरसूची पाहता येणार आहे.
परीक्षा परिषदेमार्फत रविवार, १० नोव्हेंबर रोजी घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षा पेपर-१ व पेपर – २ ची अंतरिम (तात्पुरती) उत्तरसूची यापूर्वीच प्रसिद्ध करण्यात आली होती. या परीक्षेसाठी पेपर १ व पेपर २ बाबत प्रश्नपत्रिकेतील कोणत्याही प्रश्नाबाबत किंवा पर्यायी उत्तराबाबत काही त्रुटी असल्यास विद्यार्थ्यांकडून १६ डिसेंबरपर्यंत परीक्षा परिषदेने आक्षेप मागवले होते. त्यानंतर आता अंतिम उत्तरसूची प्रसिद्ध करण्यात आली आहे.
परीक्षा परिषदेने पेपर एक आणि पेपर दोन (गणित/ विज्ञान आणि सामाजिक शास्त्र) साठी महाटेट २०२४ अंतिम उत्तरसूची प्रकाशित केली आहे. मराठी, इंग्रजी, उर्दू, हिंदी, बंगाली, कन्नड, तेलगू आणि गुजराती अशा सर्व भाषांमध्ये अंतिम उत्तरसूची उपलब्ध आहे. ही उत्तरसूची उमेदवारांना त्यांच्या कामगिरीचे मूल्यांकन करण्यासाठी महत्त्वपूर्ण साधन म्हणून काम करते.
प्राप्त झालेल्या लेखी निवेदनांवर विषयतज्ज्ञांचे अभिप्राय घेऊन अंतिम उत्तरसूची प्रसिद्ध करण्यात येत आहे. या अंतिम उत्तरसूचीबाबत कोणतेही निवेदन/ आक्षेप स्वीकारले जाणार नाहीत. या अंतिम उत्तरसूचीनुसार महाटेट २०२४ परीक्षेचा निकाल यथावकाश परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल, याचीही संबंधित परीक्षार्थीनी नोंद घ्यावी, असे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.