पुणे : पुण्यातील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या संशोधन केंद्रात देशी गायीचा ”टेस्ट ट्यूब बेबी”चा प्रयोग यशस्वी झाला आहे. या प्रयोगातून होलस्टिन फ्रिजन गाईच्या पोटी अधिक दूध देणाऱ्या साहिवाल जातीच्या कालवडीचा शुक्रवारी (ता.१६) जन्म झाला आहे.
देशी गाईंचे संवर्धन जलद गतीने होण्यासाठी कृषी विद्यापीठांच्या स्तरावर प्रथमच पुण्यात गाईंमध्येही टेस्ट ट्यूब बेबीचा प्रयोग राबविण्यात आला होता. शुक्रवारी एका होलस्टिन फ्रिजन गाईने सुदृढ देशी साहिवाल कालवडीला जन्म दिला. जन्मत: कालवडीचे वजन २७ किलो आहे. याच केंद्रात गेल्या महिन्यात होलस्टिन फ्रिजन गाईच्याच पोटी गीर जातीच्या कालवडीने जन्म घेतला.
देशात गाईंच्या ५० स्थानिक जाती आहेत. त्यापैकी साहिवाल, गीर, राठी, लाल सिंधी व थारपारकर या पाच जातींचे दुधासाठी संगोपन केले जाते. साहिवाल ही जात दिवसातून दोन वेळेला किमान १४ ते १६ लीटर दूध देऊ शकते. राठी ही राजस्थानमधील जात मराठवाडा व विदर्भात चांगल्या प्रकारे दूध देऊ शकते. त्यामुळे या केंद्रावर या दोन जातींबाबत संशोधन सुरू आहे.
दरम्यान, देशी गायीचा ”टेस्ट ट्यूब बेबी” या प्रयोग तंत्रासाठी शेतकऱ्यांना २० ते २२ हजारांचा खर्च येतो. त्यासाठी राहुरी कृषी विद्यापीठाकडून तांत्रिक सहकार्य मिळेल. पहिल्यांदा विणाऱ्या गाईंमध्ये याचा वापर केल्यास यशस्वीतेचे प्रमाण सुमारे ५० टक्क्यांपर्यंत आहे. जास्त वेत असलेल्या गाईंमध्ये हे प्रमाण ३० ते ३५ टक्क्यांपर्यंत आहे.
पुणे येथील देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख डॉ. सोमनाथ माने म्हणाले कि, गीर ही जात ठरावीक वातावरणातच चांगले दूध देते. साहिवाल ही जात कमी चारा खाऊन, कमी आजारी पडून चांगले दूध उत्पादन देते. त्यामुळेच या जातीच्या संवर्धनासाठी हा प्रयोग राबविण्यात आला. यामुळे राज्यात दूध उत्पादक शेतकऱ्यांना देशी वंशावळ असलेल्या गाई उपलब्ध होऊ शकतील. आणि त्या स्थानिक वातावरणात चांगले दूध उत्पादन देतील.