नाशिक: नाशिक शहरामध्ये गुंडांकडून हैदोस घालणे सुरूच आहे. टवाळखोरांनी सिडको परिसरातील महाकाली चौक उद्यानातील जॉगिंग ट्रॅकच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तोडफोड केल्याची घटना घडली असून शहरातील सिडको आणि सातपूर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच मागील काही दिवसांपासून उद्याने, क्रीडांगण, आणि जॉगिंग ट्रॅक परिसरात मद्यपींचा वावर वाढल्याचे पाहायला मिळत आहे. या टवाळखोरांचा बंदोबस्त करण्याचे मोठे आव्हान नाशिक पोलिसांसमोर उभे ठाकले आहे. या घटनेनंतर पोलीस नेमकी काय कारवाई करणार? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
गेल्या काही महिन्यांपासून नाशिक शहरातील सिडको, सातपूर या परिसरात चौकाचौकात टवाळखोरांची रेलचेलवाढली आहे. उद्याने, क्रिडांगणे, मोकळी मैदाने असलेल्या परिसरात गुंडांची दहशत कायम असल्याचं पहायला मिळत आहे. सिडकोतील महाकाली चौक येथील जॉगिंग ट्रॅक परिसरात महापालिकेने लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे आठ ते दहा टवाळखोरांच्या समूहाने दगडफेक करून तोडफोड केल्याचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे.
नाशिक पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह..
दिवसेंदिवस टवाळखोरांचा उपद्रव वाढल्याने नाशिक पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे राहत आहे. गुंडांच्या दहशतीमुळे सर्वसामान्य नागरिक भीतीच्या वातावरणात असून या गुंडांचा बंदोबस्त करण्याचे आव्हान नाशिक पोलिसांसमोर आहेत. महापालिकेच्या माध्यमातून लावण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे फोडतानाचा व्हिडिओ समोर आल्याने आता सिडकोतील गुंडांवर नाशिक पोलीस काय कारवाई करणार? याकडे सर्वांचेचं लक्ष लागले आहे.
सिन्नर-शिर्डी महामार्गावर साईभक्तांची वावी परिसरात लूट..
सिन्नर-शिर्डी महामार्गावर वावी शिवारात शिर्डीला साईबाबांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या पुणे येथील भक्तांची कार अडवून चौघांनी धारदार शस्त्राचा धाक दाखवला. 4 तोळ्यांचे दागिने व 25 ते 30 हजारांची रोकड काढून घेतल्याची घटना शनिवारी घडली. या घटनेने साईभक्तांमध्ये दहशत पसरली आहे. यानंतर साईभक्तांनी वावी पोलिस ठाणे गाठत अज्ञात चोरट्यांविरोधात तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, चोरट्यांचा शोध सुरू आहे.