लोणी काळभोर : एका टेम्पो चालकाने दारूच्या नशेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे . कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील रायकर हॉस्पिटलच्या परिसरात गुरुवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली आहे.
दिलीप बाबुराव देवकुळे (वय 45 स्वामी विवेकानंद नगर, कदमवाकवस्ती) असे आत्महत्या केलेल्या चालकाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिलीप देवकुळे हे टेम्पो चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. देवकुळे यांना दारूचे व्यसन जडले होते. दरम्यान मागील दोन दिवसापूर्वी त्यांची पत्नी मुलीकडे भेटण्यासाठी गेले होते. त्यांचे पत्नी गावाकडून गुरुवारी सकाळी पावणेदहा वाजण्याच्या सुमारास आल्या. त्यांनी घरात पाहिले असता त्यांना देवकुळे हे साडी ने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले.
या घटनेची माहिती मिळताच लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार केतन धेंडे, शिवाजी दरेकर व बालाजी बांगर तातडीने घटनास्थळी दाखल झाले, पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने देवकुळे यांचा मृतदेह खाली उतरविला. रुग्णवाहिकेच्या माध्यमातून त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आलेला आहे.
दरम्यान देवकुळे यांनी आत्महत्या का केले याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी दारूच्या व्यसनातून आत्महत्या केले असावे असा संशय व्यक्त करण्यात येत आहे पुढील तपास लोणी काळभोर पोलीस करीत आहेत