पुणे : राज्यात मागील काही दिवसांपासून थंडी गायब झाली असून अजूनही परतली नाही. दरम्यान, कमाल आणि किमान तापमानात झालेली वाढ किंचित कमी झाली असून पुढील आठवड्यापासून थंडी वाढण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. दक्षिण भारतातील राज्यात मागील काही दिवसांपासून पाऊस सुरू असल्यामुळे या भागाकडून राज्याकडे बाष्पयुक्त वारे वाहत आहेत.
त्यामुळे उत्तर भारताकडून येणार्या थंड वार्यांना अटकाव झाला. परिणामी राज्यातील किमान तापमानात वाढ झाली, त्यामुळे राज्यातील थंडी गायब झाली आहे. किमान तापमानाबरोबरच कमाल तापमानातदेखील वाढ झालेली आहे. ही स्थिती अजून किमान आठवडाभर कायम राहील असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
पुणे शहरातील किमान तापमानात किंचित घट
पहिल्याच दिवशी पुणे शहरातील किमान तापमानात फारशी घट झाली नाही. त्यामुळे रात्री हलकीसी थंडी होती. हवेली परिसरात सर्वात कमी १३.२ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. दरम्यान, पुढील दोन दिवस शहरासह जिल्ह्यात हवामान कोरडे आणि पहाटे हलके धुके पडणार आहे. तसेच किमान तापमानात एक ते दोन अंशाने वाढ होईल, असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे.
एनडीए, पाषाण, शिवाजीनगर परिसरातही किमान तापमान १३ ते १५ अंश सेल्सिअसच्या आसपास होते. दरम्यान, पुढील दोन दिवस शहरासह जिल्ह्यात किमान तापमानात एक ते दोन अंशाने वाढ होईल. शहरासह जिल्ह्यातील हवेली (१३.२), माळीण (१४.४), शिवाजीनगर (१४.९), पाषाण (१५.१), शिरूर (१५.५), बारामती (१५.७), आंबेगाव (१६.३), पुरंदर (१७.४), गिरीवन (१७.८) आणि कोरेगाव पार्क (१८.६) अंश सेल्सिअस नोंद झाली आहे.