लोणी काळभोर (पुणे) : राज्य सरकारने लम्पीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी भाद्रपद बैलपोळा सणानिमित्त गावातील बैलांना एकत्र करण्यास बंदी घातली आहे. याबाबत ग्रामपंचायतीनी नोटीस बोर्ड, फ्लेक्स किंवा दवंडी घेऊन पशुपालकांना शासनाच्या अधिसूचनेची माहिती द्यावी. असे हवेलीच्या तहसीलदार तृप्ती कोलते-पाटील यांनी सूचित केले आहे.
मागील दोन वर्षापासून कोरोनामुळे बैलपोळ्याच्या सणाला बैलांच्या मिरवणूक काढण्यास बंदी होती. आता यावर्षी लम्पीचा प्रादुर्भाव झाल्याने बंदी घालण्यात आली आहे. हवेली तालुक्यातही रविवारी (ता. २५) भाद्रपद बैलपोळ्याचा सण साजरा होत आहे. लम्पी चर्मरोगाच्या नियंत्रण व प्रतिबंधासाठी गुरे म्हशींचा बाजार भरवणे, प्राण्यांच्या शर्यती लावणे, प्राण्यांची जत्रा वा प्रदर्शन आयोजित करणे यासाठी बंदी घालण्यात आली आहे.
याबरोबर पशुधनाच्या वाहतुकीवरही बंदी घालण्यात आली आहे. बैलपोळा सणानिमित्त गावातील बैल मोठ्या प्रमाणावर एकत्र येऊन मिरवणूक निघण्याची शक्यता आहे. त्यामुळे ग्रामपंचायत ने याबाबत नोटीस बोर्ड, फ्लेक्स किंवा दवंडी देऊन सर्व पशुपालक यांना अवगत करावे.
दरम्यान, प्राण्यामधील संक्रामक व सांसर्गिक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम, २००९ मधील कलम ४ नुसार पशुपालक, इतर व्यक्ति व ग्रामपंचायत यांनी रोग प्रादुर्भावची माहिती देणे बंधनकारक राहील तसेच अधिनियमातील बाबींचे उल्लंघन झाल्यास कलम ३१. ३२ व ३३ मधील तरतुदीनुसार कारवाई करण्यासाठी पोलीस यांनी पशुसंवर्धन विभागास सहाय्य करण्याचे आवाहन कोलते-पाटील यांनी केले आहे.