राहुलकुमार अवचट
यवत – शासनाच्या कोणतीही परवानगी न घेता भांडगाव (ता. दौंड) येथे बेकायदेशीरपणे गुंठेवारी करणाऱ्यांना तहसीलदारांनी दणका दिला आहे. प्लॉटिंग धारकांनी “शर्त भंग” केल्या प्रकरणी जमीन सरकार जमा का करण्यात येवू नये. याबाबतचा खुलासा तात्काळ सादर करावा. अन्यथा जमीन सरकार जमा करण्यात येईल. अशी नोटीस बजावली आहे.
भांडगाव येथे गुंठेवारीच्या गोरख धंदा बाबत अनेक चर्चा असून गाव कामगार तलाठी अर्जुन स्वामी यांनी संबंधित ठिकाणी जाऊन पंचनामा करावा. याबाबतचा अहवाल दौंड तहसीलदार यांना सादर केला होता.
भांडगाव येथील गट नं.३६३ हा अरविंद गुलाबचंद सोलंकी यांच्या नावे असून सदरील जमीनीमध्ये कोणत्याही प्रकारची अकृषिक परवानगी न घेता बेकायदेशीरपणे प्लॉटिंग केली आहे. आणि प्लॉटिंगची जाहिरात करून विक्री करत असल्याने सदर जमिनीमध्ये मोठ्या उंचीची कमान व इतर स्वरूपाचे बांधकाम करून प्लॉट पाडून विक्री करण्याची जाहिरात केल्याचे आढळून आले. तसेच सदर गटाच्या चारही बाजूंनी तारेचे संरक्षक कुंपण तर काही जागेत भिंतीचे बांधकाम केले आहे.
प्लॉटिंगसाठी रस्त्याचे कच्चा मुरूम टाकून बांधकाम केल्याचे दिसून आले होते. त्या अनुशंघाने मा. तहसीलदार दौंड यांनी संबंधित जमीन मालकाला नोटीस बजावली असून सदर प्रकरणी अकृषिक वापराची परवानगी घेणे अपेक्षित असताना अकृषिक परवानगी न घेता शर्तभंग केला असल्याचे दिसून येत आहे. तरी सदर जमीन सरकार जमा का करण्यात येवू नये. याचा खुलासा तत्काळ करावा. अन्यथा जमीन सरकार जमा करण्यात येईल. अशी नोटीस बजावण्यात आली आहे.
दरम्यान, दौंड तालुक्यात पश्चिम पट्ट्यातील अनेक गावांमध्ये कसल्याही कायदेशीर नियमांची पूर्तता न करता सर्वसामान्य नागरिकांना बेकायदेशीर गुंठेवारीतील जमिनींची विक्री केली जात आहे. माळरानावरील ओसाड जमिनी कवडीमोल दराने विकत घेत लाखो रुपयांची कमाई संबंधित विकसक कमावत आहेत. बेकायदेशीर प्लॉटिंग केलेल्या जागेत भविष्यात पी.एम.आर.डी.ए.ने कारवाई केल्यास अशा बेकायदेशीर गुंठेवारीत जमिनी खरेदी केलेल्या नागरिकांचे मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते. मात्र आता तहसीलदार यांनी सदर जमीन सरकार जमा करण्याची नोटीस बजावल्या आहे, आता नोटीस आल्यावर खरच कारवाई होते का? याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.