AUS vs IND : ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा बॉर्डर गावसकर ट्रॉफीतील पाचव्या आणि अंतिम कसोटी सामन्यातील तिसर्याच दिवशीच धुव्वा उडवला आहे.ऑस्ट्रेलियाने भारतावर 6 विकेट्सने विजय मिळवत मालिका आपल्या नावे केली आहे. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 162 धावांचं आव्हान दिलं होतं. ऑस्ट्रेलियाने हे आव्हान 4 विकेट्स गमावून 27 ओव्हरमध्ये सहज पूर्ण केलं.
ऑस्ट्रेलियाने या विजयासह ही मालिका 3-1 अशा एकतर्फी फरकाने जिंकली आहे. ऑस्ट्रेलियाने 2014-2015 नंतर बॉर्डर गावसकर ट्रॉफीवर नाव कोरलं आहे. टीम इंडियाचा या पराभवासह वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमधील प्रवेशाचे स्वप्न भंग झाले आहे.
टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात याआधी 4 सामन्यांची बॉर्डर गावसकर ट्रॉफी कसोटी मालिका खेळवण्यात येत होती. ऑस्ट्रेलियाने अखेरीस 2014-15 साली मायदेशात टीम इंडियावर 2-1 अशा फरकाने मात करत मालिका जिंकली होती. त्यानंतर टीम इंडियाने सलग 3 वेळा या 2-1 अशा फरकाने ही मालिका आपल्या नावे केली होती. मात्र यंदापासून या मालिकेत 4 ऐवजी 5 सामने खेळवण्याची पहिलीच वेळ ठरली आहे.
जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वात टीम इंडियाने विजयी सलामी देत मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. त्यानंतर कौटुंबिक कारणामुळे पहिल्या सामन्यात अनुपस्थितीत असलेला नियमित कर्णधार रोहित शर्मा परतला. रोहितच्या नेतृत्वात भारताला 2 सामने गमवावे लागले तर 1 सामना बरोबरीत राहिला. त्यामुळे चौथ्या सामन्यानंतर ऑस्ट्रेलियाने मालिकेत 2-1 ने आघाडी घेतली.
रोहितने कॅप्टन्सी आणि बॅटने फ्लॉप ठरल्याने पाचव्या सामन्यातून माघार घेतली होती. त्यामुळे पुन्हा एकदा बुमराहला नेतृत्वाची संधी होती. मात्र बुमराह आणि ऋषभ पंतचा अपवाद वगळता इतर कुणालाही आपली जबाबदारी पार पाडता आला नाही. त्यामुळे टीम इंडियाला सामन्यासह ही मालिका गमवावी लागली.
सामन्याचा आढावा..
टीम इंडियाने पहिल्या डावात सर्वबाद 185 धावा केल्या. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी कमबॅक करत कांगारुंना 181 वर गुंडाळलं आणि 4 धावांची आघाडी मिळवली. मात्र टीम इंडियाला दुसऱ्या डावातही 200 पार मजल मारता आली नाही. टीम इंडियाचा दुसरा डाव हा157 धावांवर आटोपला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने विजयासाठी मिळालेलं 162 धावांच आव्हान हे सहज पूर्ण केलं आणि मालिका जिंकली.
ऑस्ट्रेलिया प्लेइंग ईलेव्हन : पॅट कमिन्स (कर्णधार), सॅम कॉन्स्टास, उस्मान ख्वाजा, मार्नस लबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रेव्हिस हेड, ब्यू वेब्स्टर, एलेक्स कॅरी, मिचेल स्टार्क, नॅथन लायन आणि स्कॉट बोलँड.
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : जसप्रीत बुमराह (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, शुबमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, नीतीश कुमार रेड्डी, वॉशिंगटन सुंदर, मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा.