Ind vs Aus 5th Test : ऑस्ट्रेलियाच्या स्कॉट बोलंड आणि मिचेल स्टार्कच्या भेदक गोलंदाजीसमोर टीम इंडियाने अक्षरशः शरणागती पत्करली आहे. त्यामुळे टीम इंडियाच्या टॉप ऑर्डरची पुन्हा एकदा घसरगुंडी झाली आहे. टीम इंडियाच्या एकाही खेळाडूला 40 च्या वर धावा करता आलेल्या नाहीत. त्यामुळे टीम इंडियाचा पहिला डाव 185 धावांवर ऑल आऊट झाला आहे. ही धावसंख्या भारतासाठी अजिबात सन्मानजक नाही. त्यामुळे आता टीम इंडियात गोलंदाजीत काय कमाल करते हे बघणं महत्वाचं ठणार आहे. आस्ट्रेलियाने प्रत्युत्तरात पहिल्या डावाची सुरवात केल्यानंतर 9 धावा करत एक गडी गमावला आहे. जसप्रीत बुमराहने ख्वाजाची विकेट घेऊन ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का दिला आहे.
कर्णधार जसप्रीत बुमराहने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी भारतीय संघाला पहिला धक्का केएल राहुलच्या (4) रूपाने बसला. तो मिचेल स्टार्कच्या चेंडूवर सॅम कॉन्सटासने स्क्वेअर लेगवर झेलबाद झाला. त्यानंतर दुसरा सलामीवीर यशस्वी जैस्वाल (10) जास्त वेळ तग धरू शकला नाही. त्यानंतर शुभमन गिलने (20) नॅथन लियॉनचा चेंडू पुढे खेळण्याचा प्रयत्न करत असताना तो स्लिपमध्ये झेलबाद झाला.
त्यानंतर चौथ्या क्रमांकावर विराट फलंदाजीस आला. यावेळी ऑस्ट्रेलियाकडून बोलंड गोलंदाजी करत होता. बोलंडने उत्कृष्ट गुड लेंथ बॉल टाकली आणि विराटच्या बॅटीचा कड लागून थेट स्टीव्ह स्मिथच्या हाती गेला होता. मात्र कॅच पकडताना बॉल मैदानाला लागल्याने विराटला नॉट आऊट करार देण्यात आलं होतं. लंचनंतर विराट कोहलीही ऑफ स्टंपचा चेंडू जबरदस्तीने खेळल्यामुळे पुन्हा एकदा बाद झाला. 17 धावा केल्यानंतर कोहली स्कॉट बोलँडच्या चेंडूवर ब्यू वेबस्टरकडे झेल देऊन बाद झाला.
कोहली आऊट झाल्यानंतर भारताचे एकाच ओव्हरमध्ये लागोपाठ दोन विकेट पडले. पहिल्यांदा रिषभ पंत आऊट झाला तर दुसऱ्याच बॉलवर नितीश रेड्डीची विकेट पडली. त्यामुळे ऋषभ पंतने सर्वाधित 40 धावा केल्या. तर नितीश रेड्डी शुन्यावर बाद झाला.
त्यानंतर मैदानात उतरलेल्या वॉशिग्टन सुंदर 14 तर सिराज आणि प्रसिद्द कृष्णाने प्रत्येकी 3 धावा केल्या. तसेच कर्णधार जसप्रीत बुमराहने दमदार फलंदाजी करत तडकाफडकी 22 धावा चोपल्या.
ऑस्ट्रेलिया खेळ संपेपर्यंत 176 धावांनी पिछाडीवर आहे. ऑस्ट्रेलियाने 185 धावांच्या प्रत्युत्तरात 9 धावा केल्या आहेत. तर कर्णधार जसप्रीत बुमराहने उस्मान ख्वाजाला दिवसातील शेवटच्या बॉलवर केएल राहुल याच्या हाती कॅच आऊट करत ऑस्ट्रेलिया पहिला झटका दिला. उस्मान ख्वाजा 10 बॉलमध्ये 2 रन्स करुन आऊट झाला. यासह पहिल्या दिवसाचा खेळ संपल्याचं जाहीर करण्यात आलं. सॅम कॉन्स्टास 7 धावांवर नाबाद परतला आहे.
सिडनी कसोटीत भारताचे प्लेइंग-11: यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, शुभमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), नितीश कुमार रेड्डी, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, प्रसिद्ध कृष्णा, जसप्रीत बुमराह (कर्णधार) आणि मोहम्मद सिराज.
सिडनी कसोटीत ऑस्ट्रेलियाचे प्लेइंग-11: सॅम कॉन्स्टास, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, स्टीव्ह स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, ब्यू वेबस्टर, ॲलेक्स कॅरी (यष्टीरक्षक), पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, नॅथन लायन, स्कॉट बोलँड.